शिवसुमन आनंदाश्रमात साहित्य भेट देवून साजरा केला ज्येष्ठ नागरिकदिन, वृद्धांना राहण्याची निसर्गरम्य परिसरात व्यवस्था
जुने सिडको येथील महात्मा फुले हास्य क्लबतर्फे गंगापूरच्या जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लबमध्ये सामाजिक उपक्रमांचे आयोजन



नाशिक (प्रतिनिधी) – येथील गंगापूर गावाजवळ असलेल्या जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लब संचलित शिवसुमन आनंदाश्रमात आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिकदिन वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा करण्यात आला. गंगापूर गावाच्या जवळ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुुक्त विद्यापीठ रस्त्यालगत असलेल्या शिवसुमन आनंदाश्रमात ज्येष्ठ नागरिकांना कायमस्वरूपी राहण्यासाठी आधुनिक पद्धतीची घरे तयार करण्यात आली आहेत. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने जुने सिडको येथील महात्मा फुले हास्य क्लबतर्फे साहित्य भेट देत उपक्रम साजरा करण्यात आला. यावेळी शिवसुमन आनंदाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते केक कापून तसेच मिठाईवाटप करून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
नाशिकच्या शांतीदूत एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटीतर्फे जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लब तसेच शिवसुमन आनंदाश्रमासोबतच कामगार वसाहतीतील मुलांसाठी शिवसुमन इंग्लिश मीडियम स्कूल चालवली जाते. या शाळेसाठी शैक्षणिक साहित्य भेट देतानाच शिवसुमन आनंदाश्रमात दैनंदिन गरजेच्या वस्तू महात्मा फुले हास्य क्लबतर्फे भेट देण्यात आल्या. यावेळी महात्मा फुले हास्य क्लबच्या अध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या भारती चौधरी यांच्यासमवेत हास्य क्लबच्या सदस्या उपस्थित होत्या.
अशी आहे व्यवस्था…
शिवसुमन आनंदाश्रमात वृद्धांसाठी कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था उभी करतानाच उतारवयातील वृद्धांच्या गरजांचा विचार करून येथे निवास व्यवस्था उभी करण्यात आली आहे. नाममात्र शुल्कात निवासव्यवस्था उभी करतानाच प्रशस्त वाचनालय, निसर्गरम्य परिसरात मनोरंजन, करावके, भव्य एक एकर परिसरात वृद्धांसाठी उभी असलेली व्यवस्था इथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.







