वयाच्या 32व्या वर्षी दहावी पास झाल्या… मात्र अधिकारी म्हणून रिटायर झाल्या मुंजवाडच्या सुमन जाधव…
सुमन जाधव : मला भेटलेली माणसं... विजयकुमार इंगळे



बागलाण तालुक्यातील मुंजवाडच्या सुमनाताई जाधव यांनी कमी शिक्षण असलेल्या कुटुंबातून येऊनही सरकारी अधिकारी पदापर्यंत झेप घेतली…!
9 वी नंतर शाळाच सुटली… अनोळखी विषयांची ओळखच नव्हती… कुटुंबाच्या चार भिंतीतून बाहेर पडणं शक्यच नव्हतं… पण आयुष्याला कलाटणी देणारा क्षण नक्कीच ठरलेला होता. लग्नानंतर 13 वर्षांच्या मोठ्या खंडानंतर पुन्हा शिक्षणात प्रवेश करत, पावलोपावली नापासाचा शिक्का पुसत त्या सरकारी अधिकारी झाल्या.
अगदी लहान वयात लग्न झाल्याने त्यांचे शालेय शिक्षण संपले. 1978 साली लग्न होऊन सुमनाताई पती शिवाजी जाधव यांच्या घरी आल्या… शिवाजी जाधव नाशिकच्या सातपूर येथील इंडियन टूल्स कंपनीत नोकरीला होते. लग्नानंतर काही महिन्यातच सुमनाताई त्यांच्यासोबत नाशिकला राहायला गेल्या. मोठ्या कुटुंबात स्वयंपाकाची जबाबदारी सांभाळत मुलांचा सांभाळ करणं हाच त्यांचा दिनक्रम झाला होता. पुढे काय होणार याचा विचार तरी कोण करणार? पण त्यांच्या पती शिवाजी जाधव यांनी त्यांच्यातील कुशाग्र बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती ओळखून त्यांना आशेचा नवा किरण दाखवला.

नाशिकमध्ये राहत असताना 1990 साली त्यांना अंगणवाडी सेविका म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्यांना अवघा 175 रुपये पगार मिळत होता… मुंबई नाक्याच्या झोपडपट्टी भागात सेवा करण्याची संधी मिळाली. सुविधांचा अभाव, घाणीने भरलेली आणि अव्यवस्थित परिस्थितीला तोंड देत त्यांनी चिमुकल्यांसाठीचे प्रयत्न कमी होऊ दिले नाहीत. दोन वर्षानंतर त्यांची बदली वडाळा गावात झाली, तिथे त्यांनी पुन्हा मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व ओळखले आणि पालकांमध्ये सक्रियपणे जनजागृती केली. मालेगाव भागातील अंगणवाडीत काम करत असताना शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी काम केले. दरम्यान, त्यांनी आपला अनुभव आणि सेवेच्या बळावर महिला व बालविकास विभागात सुपरवायझर पद मिळवले. तिथून त्यांनी आपली क्षितिजे विस्तारली.

9 वी नापास ते 13 वर्षांनंतर मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळण्यापर्यंतचा सुमनाताईंचा प्रवास हा कदाचित महानगरपालिकेच्या इतिहासातील एक दुर्मिळ यश होते. अंतर्गत परीक्षा, मित्र-मैत्रिणी आणि पती शिवाजी जाधव यांच्या पाठिंब्याने त्या परीक्षेला बसल्या. कसं लिहायचं? याबद्दल त्यांनी मार्गदर्शन घेतलं. 2002 साली त्यांनी ठाणे येथे सुपरवायझर पदाचा कार्यभार स्वीकारला. खुल्या स्पर्धेतून हे पद मिळवणाऱ्या त्या आपल्या कुटुंबातील पहिल्या महिला ठरल्या. त्यावेळी त्यांच्याकडे 200 हून अधिक अंगणवाड्यांच्या समन्वयाची जबाबदारी होती.
कामाशी प्रामाणिक निष्ठा
कोणत्याही विभागात काम केले तरी कामाशी निष्ठा हीच त्यांची ओळख राहिली. याचीच दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुमनाताईंची तपासणी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. ठाणे आणि नाशिक जिल्ह्यात अधिकारी म्हणून त्यांना समाजसेवेची संधी मिळाली. हजारो मुलींचे आयुष्य बदलून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची संधी मिळाल्याचे समाधान त्यांना वाटते. आज सुमनताई जाधव आपल्या या प्रवासाकडे अभिमानाने पाहतात. सध्या ज्येष्ठ नागरिकांना उतारवयात आधार देणाऱ्या नाशिकच्या गंगापूर येथील जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमाच्या उपाध्यक्षा म्हणून सुमनताई जबाबदारी पुढे नेताहेत.





