मनाचे गुलाम न होता मनाचे मालक व्हा…
माजी प्राचार्या शैलजा लवेकर - नाशिक एज्युकेशन सोसायटीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन


जीवनात यशस्वी होण्यासाठी मनाचे आणि सवयींचे गुलाम न होता आपणच मनाचे मालक व्हावे म्हणजेच मनाला आपण दास बनवावे असे प्रतिपादन असे प्रतिपादन नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या मा.रा.सारडा कन्या विद्या मंदिर शाळेत शाळेच्या देणगीदार कै.मातोश्री रामप्यारीबाई सारडा आणि माजी मुख्याध्यापिका कै.लिलाताई ठकार यांचा स्मृतीदिना निमित्त मु.शं.औरंगाबादकर सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्या शैलजा लवेकर यांनी विद्यार्थिनांना मार्गदर्शन करताना केले. त्यापुढे म्हणाल्या की, प्रत्येक मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो जेव्हा आपण शिकवायला सुरुवात करतो त्यावेळी आपले खरे शिकणे सुरू होत असते त्यामुळे शेवटपर्यंत आपण अभ्यासाचा कंटाळा न करता मनापासून शिकत राहणे आवश्यक आहे. त्यासाठी शाळेविषयी स्मृती जागृत केल्या पाहिजे. विद्यार्थिनींनी सतत अभ्यासात मेहनत, परिश्रम, जिद्द व चिकाटी ठेवावी. उच्च ध्येय बाळगून शाळेचे व पालकांचे नाव मोठे करावे, असे सांगुन संस्थेत व शाळेस शुभेच्छा दिल्या तसेच याप्रसंगी त्यांनी विद्यालयास रुपये पाच लाख देणगी दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके हे होते. त्यांनी संस्थेच्या देणगीदार कै.रामप्यारीबाई सारडा व कै.लीलाताई ठकार यांच्या विषयी आदरभाव व्यक्त करून त्यांच्या कार्याचा व संस्कारांचा वारसा संस्थेने जपलेला आहे.यात अनेक माजी विद्यार्थ्यांचा सहभाग असतो.यामुळे शिक्षकांना प्रेरणा मिळते.विद्यार्थिनींना उद्देशून आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग योग्य पध्दतीने असे.असे सांगून शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर सारडा परिवारातील श्रीमान हर्षवर्धन श्रीरंग सारडा आणि रिद्धी सारडा,शाळा समिती अध्यक्षा सरोजिनी तारापूरकर,कार्यवाह राजेंद्र निकम मुख्याध्यापिका नंदिनी कहांडळ, उपमुख्याध्यापिका मनीषा देशपांडे , पर्यवेक्षिका मृण्मयी खरवंडीकर, शिक्षक प्रतिनिधी रामदास चव्हाण, हेमंत शिंगणे, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा पल्लवी तिडके आदी उपस्थित होते. यावेळी हर्षवर्धन सारडा आणि रिद्धी सरडा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सर्व विद्यार्थिनींना भावी प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या व शाळेच्या प्रगतीबद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी स्मृतिदिनानिमित्त विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या शाळेच्या नामवंत माजी विद्यार्थिनी डॉ.सोनल देशमुख, दिपाली चंद्रात्रे, प्रियंका हासे,संतोषी आहेर, विद्या कुलकर्णी, कृपा परदेशी, अंकिता बाबरिया, वृषाली सुतार यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी सत्कारार्थी डॉ.सोनल देशमुख आणि विद्या कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.सोनल देशमुख यांनी शाळेला स्मार्ट बोर्ड भेट देण्याची घोषणा केली.

कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यातआली.स्वागतगीत ओंकार वैरागकर व गीतमंच यांनी सादर केले.शाळा समिती अध्यक्षा सरोजिनी तारापूरकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मुख्याध्यापिका नंदिनी कहांडळ यांनी मातोश्री रामप्यारीबाई सारडा व लीलाताई ठकार यांच्या कार्याचा आढावा सादर केला.अतिथींचा परिचय विवेक पाटील आणि सुप्रिया देशपांडे यांनी करून दिला. सत्काराचे निवेदन सीमा खैरनार आणि वैशाली गोजरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयावंती मते यांनी तर आभार पर्यवेक्षिका मृण्मयी खरवंडीकर यांनी मानले. कार्यक्रमास कार्यकारिणी सदस्या रंजना परदेशी, शाळा समिती सदस्या मंगला निकम, मोहिनी तुरेकर, प्रियंका निकम, अनुराधा अहिरे, कमलाकर चंद्रात्रे यांचेसह विद्यार्थिनी शिक्षक- शिक्षकेतर उपस्थित होते.




