ज्येष्ठ नागरिक वृत्तविकासाची वाट न्यूज विशेषशहरसामाजिकसांस्कृतिक

गोकर्ण यात्रेचा मंगलमय प्रवास

ओमप्रकाश शर्मा (सामाजिक कार्यकर्ते, नाशिक)

मंगला एक्सप्रेसने मंगल प्रवासाची सुरुवात ही स्थानकावर वरुण देवाने आपले पवित्र मंगल जल शिंपडून नाशिक ते गोकर्ण साठी प्रस्थान करविले. सह प्रवासांत बऱ्याच मंगला असल्याचे कळले. नाशिकहून गोकर्णच्या दिशेने मंगला एक्स्प्रेसने निघालेली ही यात्रा केवळ भौगोलिक अंतराची नव्हे, तर ती एक अंतर्मनाच्या गाभाऱ्यात नेणारी अध्यात्मिक व आत्मानुशोधनाची वाटचाल होती. भक्तीच्या रुळावरून धावत आस्थेची ही गाडी निघाली होती. रेल्वे स्थानकावरून आपापल्या आसनावर स्थानापन्न नव्हे तर निद्रा राणीच्या स्वाधीन होण्याची धडपड जाणवली. पट्टीचे निद्रा वीर बेडशीट व ब्लॅंकेट घेऊन यशस्वीपणे झोपी गेले.

मी मात्र मनात उत्सुकता धारण करून – ‘गोकर्ण’ या पावन भूमीचे दर्शन कसे होईल? याच स्वप्नात हरवलो होतो. परंतु त्या आधी मंगला एक्स्प्रेसने सुरु झालेला प्रवास म्हणजेच एक प्रकारचे ध्येयाकडे नेणारी नव्हे पळणारी राणी बनली आहे असा विचार डोकावत होता. ट्रेन आपल्या गतीने धावत होती… खिडकीबाहेर पसरलेली शेतं, डोंगररांगा, आकाशात झुलणाऱ्या ढगांच्या रचना – या सगळ्यांनी मन थोडं थबकलं. झपाट्याने बदलणाऱ्या दृश्यांप्रमाणेच जीवनही क्षणभंगुर आहे, ही जाणीव मनात जागी झाली.
“जीवन हा एक प्रवास आहे, स्थळ नव्हे” – हे तत्वज्ञान जणू मंगला एक्सप्रेसच्या प्रत्येक वळणावर शिकवत होती. सहप्रवासी शांत, काही जप करत होते, काही ध्यानस्थ होते… आणि काही सहजच मौनात होते – पण त्या मौनातही शब्द होते – मनाशी संवादाचे. त्या गूढ शांततेत गोकर्णच्या महाबळेश्वराची छबी सतत डोळ्यांपुढे तरळत होती. रात्रीच्या प्रवासात खिडकीबाहेर पसरलेलं अंधाराचं साम्राज्य एक गूढता निर्माण करत होतं. ते अंधारही जणू सांगत होते – “जीवनात प्रकाश शोधायचा असेल, तर प्रथम अंधार स्विकारावा लागतो.” मग त्या डब्यातला मंद प्रकाश, कुणाच्या जपमाळेचा ठेका, कुणाच्या ओठांवरील “हरे कृष्ण हरे कृष्ण”चा गजर, हे सारं एका सात्विक लयीने हृदयाला शांत करत होते.

प्रत्येक स्टेशन, प्रत्येक थांबा म्हणजेच आयुष्यातील काही अनुभव, काही धडे… काही क्षण फक्त वाट थांबायची आणि पुढे निघायचं, हे रेल्वे शिकवत होती. संध्याकाळच्या वेळी डब्याच्या खिडकीतून डोकावणारा सूर्यास्त, त्याच्या चटपटीत पण नम्र किरणांनी आठवतं ठेवत होता. “प्रत्येक दिवशी अस्त होतो, पण पुन्हा उजाडतो… आणि आपणही पुन्हा नव्या आशेने उठतो.” आणि मग शेवटी, अठरा तासांच्या मार्गक्रमणानंतर कुमठा स्थानक जवळ आले तेव्हा मनात एक गूढ आनंदाची लहर उमटली. जणू मंगला एक्सप्रेसने एक पवित्र, शांत, मनशुद्ध करणारं १८ तासाचं तप पूर्ण केलं होतं. हा प्रवास केवळ ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी नव्हता. तर तो होता आत्म्याच्या अधिक जवळ जाण्याचा. गोकर्णात प्रवेश करण्याआधीच, आपल्यातील “गोकर्ण” म्हणजे देवत्वाची ओळख, मंगला एक्सप्रेसने करून दिली होती.

ही गोकर्ण यात्रा नोंदवून ठेवावी अशी…
ही आठवण हृदयात जपावी अशी…
कारण प्रवासाच्या या वाटेमध्येच, जीवनाचे शाश्वत बोध लपलेले होते. संध्याकाळचा प्रसाद “उदर भरणं नोहे जाणिजे यज्ञ कर्म” व हेच विचार घेऊन उद्या पुन्हा एका नाविन्यपूर्ण अनुभव घेण्यासाठी झोपतो.

नम्र आवाहन, आपणही आपले 13 रुपये सत्पात्री दान आपल्या सोयीने वृद्धाश्रमाला देवू शकता… नाशिक येथील जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम सुरू करण्यात आला आहे. सामाजिक उपक्रमाला नक्कीच आपले पाठबळ असू द्यात. समाजातील संस्कारांची पिढी जगातून नष्ट होवू पाहत असताना नाशिकच्या गंगापूर परिसरात सुरू करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमास आपणही 13 रुपयांची मदत करू शकतात. आपल्याला स्वेच्छेने सामाजिक कार्यासाठी 13 रुपये दान करायचे असल्यास त्यांनी नक्कीच जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमला मदत करू शकता. आपली 13 रुपयांची मदत देण्यासाठी क्यूआर क्रमांक पुढीलप्रमाणे आहे. शांतीदूत एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटी, सातपूर, नाशिक.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!