आई माझी मायेचा सागर…
प्रा.डॉ. सारिका क्षीरसागर (सहाय्यक प्राध्यापिका, मविप्र समाज संस्था तसेच सामाजिक कार्यकर्त्या, नाशिक)



माझ्या आईचे नाव सौ चंद्रकला शिवाजी क्षिरसागर, तिचे माहेरचे नाव सीनाबाई रामचंद्र रायते असे आहे. माझ्या आईला चार भाऊ आणि ती एकटी बहीण आहे. माझे मोठे मामा श्री. इंद्रभान रायते निफाड कोर्टात वकिली करतात, दोन नंबरचे मामा श्री. अशोक रायते आणि तीन नंबरचे मामा श्री. पांडुरंग रायते हे दोघेही शेती करतात आणि चार नंबरचे मामा डॉक्टर भाऊसाहेब रायते हे लासलगाव येथे असतात. आई ही पाच नंबरचे अपत्य आहे. माझे आजोबा कै. रामचंद्र जयराम रायते आणि माझी आजी नर्मदाबाई रामचंद्र रायते या दांपत्याची ही पाच मुले. या पाचही मुलांना खूप चांगले संस्कार या दोघांनी दिले. धार्मिक वातावरण आणि संस्कार सर्व बाबतीत हे वेगळे आहेत. भाऊ बहीण म्हणून त्यांचे नातेसंबंध फार चांगले आहेत. तिचे भाचे, भाच्या ह्या सर्वांबद्दल तिला अतिशय आस्था आहे. आईचे दोन चुलतभाऊ भाऊसाहेब मामा आणि बाळूमामा तसेच पुष्पामावशी, केदुमावशी, नंदा मावशी, लहानू मावशी, स्वाती मावशी आणि शैला मावशी ह्या चुलत बहिणी. या लहानपणापासून आजपर्यंत जिवाभावाने राहतात. अशा गोकुळात वाढलेली माझी आई.

त्यानंतर माझ्या तीन आत्या सौ. सिंधुबाई गायकवाड (धामोडे), सौ. लक्ष्मीबाई तासकर (रुई) आणि सौ. मंदाकिनी इकडे (नांदूर मध्यमेश्वर) यांच्याबरोबर देखील आईच नातं छान आहे. माझ्या चार माम्या सौ. शालिनी, सौ. सूमन, सौ. सुशीला आणि सौ. संध्या तसेच दोघी काकू सौ. विमल आणि सौ. मंदा या आईच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या स्त्रिया. एकत्र पंढरपूरची वारी करणे, एकत्र त्र्यंबकेश्वर ची वारी करणे. एकत्र सणवार – उत्सव साजरे करणे यासाठी या एकत्र येतात.


अत्यंत पारदर्शक स्वभाव, कोणाबद्दल मनात काहीही न ठेवणे, सर्वांना मदत करणे, कोणाचाही राग न करणे ही आईच्या स्वभावाची वैशिष्ट्ये. आम्ही तीन भावंड. मी डॉ. सारिका क्षिरसागर तिडके केटीएचएम महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरी करते. माझे दोन भाऊ सचिन आणि प्रदीप हे दोघेही शेती करतात. माझा मुलगा मयंक हा सहावीत शिकतो. माझ्या मोठ्या भावाला दोन मुले आहेत वरद आणि यश आणि लहान भावाला संस्कृती आणि मल्हार ही दोन मुले. आईला ही पाच नातवंडे आहेत यांच्याकडे सुद्धा आई तितकच प्रेमाने लक्ष देते, त्यांचा अभ्यास घेणे, सांभाळ करणे हे देखील ती करते आणि सर्वांवर खूप प्रेम करते.
माझे वडील श्री शिवाजी क्षिरसागर हे बँकेत नोकरीला होते साधारणतः वीस-बावीस वर्षांपूर्वी एक्सीडेंट झाल्याकारणाने त्यांच्या मेंदूला इजा झाली आणि त्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर झाला. या मोठ्या प्रसंगातून आमच्या आईने खूप स्वतःला सावरले. हा प्रसंग आमच्या कुटुंबासाठी आयुष्यातील खूप मोठा माईल स्टोन ठरला. या प्रसंगामध्ये आमचे मामा आमच्याबरोबर मोठे आधारस्तंभ उभे राहिले. एवढ्या सगळ्या आजारपणातून वडील आज आमच्या समोर आहेत याचा आम्हाला आनंद आहे. वडिलांच्या आजारपणा नंतर त्यांच्याशी बरे आहात का? जेवण केलं का? अशा प्रश्नांशिवाय मनातली कोणती गोष्ट आम्ही त्यांच्याशी शेअर करू शकत नाही. त्यामुळे आमची आई ही आमच्यासाठी खूप मोठी आधारस्तंभ आहे. आहे त्या परिस्थितीत कसे आनंदी राहायचे हे आम्ही तिच्याकडून शिकलो. माझे दोन काका श्री पंढरीनाथ क्षिरसागर आणिश्री सूर्यभान क्षिरसागर हे सुद्धा आमच्यामागे उभे राहिले.

माझ्या दोन वहिन्या सौ. कविता सौ. स्नेहल यांच्याशी वागताना सुद्धा कुठलाही सासूपणा न दाखवता तिचे वागणे असते. तसेच जावई श्री. अनिल तिडके यांचे देखील आदरा तिथ्य ती व्यवस्थित करते. अशा प्रकारे सासरी माहेरी तसेच आमच्या तिघा भावंडांच्या सासुरवाडीचे संबंध देखील आईने चांगल्या प्रकारे जपले आहेत. म्हणजे तिच्यामुळे कुटुंबात कोणालाही कधी त्रास झालेला नाही.
मला कुठल्याही वर्कशॉप, सेमिनार, एफडीपी, कॉन्फरन्स तसेच अनेक प्रोग्राम साठी बाहेरगावी जायचे असेल तर ती माझ्यासाठी उभी असते म्हणून माझ्या यशामध्ये आईचा खूप मोठा वाटा आहे. तिने जन्म तर दिलाच परंतु आयुष्यातील प्रत्येक प्रसंगात ती खंबीर पणे उभी राहिली, सगळ्या गोष्टीला साथ दिली आणि मी माझ्या आईमुळेच एवढ्या गोष्टी करू शकले. माझ्या सर्व पदव्या, पुरस्कार याचे श्रेय माझी आई चंद्रकला आणि माझे पती अनिल यांना जाते. त्यांनी मला केलेला सपोर्ट हा माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे त्यांच्यामुळेच मी हे सर्व करू शकले. या निमित्ताने मी त्यांचे ऋण व्यक्त करते.




