विराट कोहलीच्या डोळ्यांत अश्रू पाहून चाहतेही झाले भावूक
तब्बल 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरसीबीने कोरले विजेतेपदावर नाव... 90 हजार प्रेक्षकांची सामन्याला उपस्थिती

पंजाब किंग्जवर विजय मिळवत आरसीबीने मिळवले जेतेपद
अहमदाबाद ( वृत्तसंस्था) : आयपीएल 2025 स्पर्धेत अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने जेतेपदावर नाव कोरलं आहे. 17 पर्व आरसीबीचं स्वप्न पूर्ण होता होता राहीलं. या 17 वर्षात तीनदा जेतेपदाची संधी आली होती. पण तिन्ही वेळेस पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. पण 18 व्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला जेतेपद मिळालं. जेतेपदाचं स्वप्न पूर्ण होताना पाहून विराट कोहलीला अश्रू अनावर झाले. शेवटच्या षटकात पंजाब किंग्सला विजयासाठी 29 धावांची गरज होती. विराट कोहलीसह संपूर्ण संघ तणावात होता. शेवटचं षटक टाकण्यासाठी जोश हेझलवू मैदानात आला होता. त्याने पहिले दोन चेंडू निर्धाव टाकल्यानंतर विराट कोहलीला विजयाचा विश्वास झाला. सीमेवर क्षेत्ररक्षण करताना त्याचे डोळ्यातून अश्रू आपसूक बाहेर निघाले. गेली 17 वर्षे ज्या गोष्टीची वाट पाहात होता ते स्वप्न पूर्ण होताना पाहून विराट कोहलीला अश्रू अनावर झाला. प्रत्येक चेंडूनंतर विजय पक्का होत होता आणि विराट कोहली भावूक होत होता.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची 17 वर्षांची प्रतीक्षा संपली. 18 व्या पर्वात अंतिम सामन्यात पंजाब किंग्सचा पराभव करून आरसीबीने पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. यासह आरसीबीचे जेतेपदाचं स्वप्न पूर्ण झालं आहे. आरसीबीने पंजाब किंग्ससमोर विजयासाठी 191 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण पंजाबचा संघ 7 विकेट गमावून फक्त 184 धावा करू शकला. पंजाबकडून शशांक सिंगने सर्वाधिक नाबाद 61 धावा केल्या, परंतु तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
आरसीबीच्या अंतिम सामन्यासाठी आरसीबीचे अनेक आजी माजी खेळाडू मैदानात उपस्थित होते. ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स देखील खास सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. दरम्यान तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत दुखापतीमुळे बाहेर झालेला देवदत्त पडिक्कल देखील अंतिम सामन्यासाठी उपस्थित होता.
कुणाल पंड्या ठरला सामनावीर…
संपूर्ण सामन्यात लक्ष वेधून घेणारा आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या हा सामन्यात सामनावीर ठरला आहे. कृणालने चार षटके टाकताना 12 डॉट बॉल टाकत दोन खेळाडू बाद केले. कृणालची खेळाडू म्हणून आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची ही चौथी वेळ ठरली. मुंबईने पाचदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.





