मदतीला धावणाऱ्या देशशिरवाडे ग्रामस्थांची अवहेलना कधी थांबणार?
नाशिक- गुजरात महामार्गावर पुन्हा ग्रामस्थांतर्फे रास्ता रोको...

साक्री (वार्ताहर) : महामार्गावरील अपघात असो, आपत्कालीन दुर्घटना असो वा वाहतुकीची कोंडी असो… या साऱ्या प्रसंगात नेहमीच माणुसकी जपत सलोख्याचे दर्शन घडवणाऱ्या देशशिरवाडे येथील ग्रामस्थांवर पुन्हा पुन्हा रास्ता रोको आंदोलन करण्याची वेळ यावी, हेही दुर्दैव म्हणावे लागेल…
नाशिक – नवापूर महामार्गावरील असलेल्या देशशिरवाडे येथील ग्रामस्थांवर पुन्हा रास्ता रोको करण्याची वेळ आली. यामुळे महामार्गावरील वाहतूक तीन तास खोळंबली होती.
येथील बसस्थानकावर बस थांबतच नसल्याने नागरिक आणि विद्यार्थ्यांचे हाल होत होते, याच मुख्य मागणीसाठी जेष्ठ नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने एकत्र येत त्यांनी सकाळी मुख्य रस्त्यावर तीन तास रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली होती.
रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी किरण बर्गे, पीएसआय भुषण शेवाळे, प्रवीण चौरे यांच्यासह त्यांच्या टीमने या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला. देशशिरवाडे ग्रामस्थांनी आज सकाळी पिंपळनेर ते शेलबारी घाटाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ठिय्या मांडत एसटी महामंडळाच्या मनमानी कारभाराचा निषेध केला. बस स्थानकावर बस न थांबता पुढे निघून जात असल्याने प्रवाशांना होणाऱ्या त्रासामुळे हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जेष्ठ नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या देशशिरवाडेची अवहेलना थांबवा…
शासनातर्फे हात दाखवा, एसटी थांबवा… यांसारखे उपक्रम राबवून नेहमीच उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला नागरिकांना बस थांबण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनाची वेळ येणे, योग्य नाही. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. देशशिरवाडे गाव हे केवळ शेतकरीबहुल गाव नसून, पिंपळनेर-शेलबारी घाटादरम्यान कोणताही अपघात झाल्यास येथील नागरिक, सरपंच, उपसरपंच आणि शेतकरी वर्ग मदतीसाठी धावून येतात. हीच देशशिरवाडे गावाची ओळख आहे. सामाजिक बांधिलकी मानून नेहमीच परिसरातील आपत्कालीन परिस्थिती असो… महामार्गावरील अपघात असो वा अन्यही सामाजिक घटनांमध्ये देशशिरवाडे येथील ग्रामस्थ मदतीसाठी धावतानाच माणुसकीचे दर्शन घडवत असतात. वेळप्रसंगी पदरमोड करून आर्थिक मदतही देण्यात नेहमीच तत्पर असतात. ग्रामस्थांची सामाजिक बांधिलकी आणि आपत्कालीन परिस्थितीत समाजमन जपणाऱया देशशिरवाडे येथील ग्रामस्थांवर रास्ता रोको करण्याची वेळ यावी, हे अतिशय दुर्दैवी आहे.






