विशेष

पर्यावरणाला साद घालणारी सायकल : काळाची गरज

ओमप्रकाश शर्मा, सामाजिक कार्यकर्ते, नाशिक

३ जुन…, जागतिक सायकल दिवस. पर्यावरण व आरोग्य ह्या दोन वेगळ्या गोष्टी असल्या तरी अत्यंत पुरक आहेत. परंतु सायकल हे ह्या दोन्ही गोष्टींची पूर्तता करण्यासाठी उपयोगी ठरु शकते म्हणूनच युनेस्को तर्फे सायकल दिवस साजरा करण्यासाठी २०१८ पासून सुरू झालेला आहे.

तसं बघितलं तर सायकलीचा आविष्कार १८१७ साली जर्मनीत झाला. १८५० च्या आसपास फ्रान्समध्ये ही प्रचलित व्हायला सुरुवात झाली. आयुष्यात तोल सांभाळत ध्येयाकडे वाटचाल कसें करावं हे शिकवणारी जर कोणती वस्तू असेल तर ती सायकल. १९ व्या शतकात अवतरलेली तरी २० व्या शतकात मध्यम प्रवासासाठी बैलगाडी नंतर सायकल वापरण्याकडे जास्त कल होता.

सुरवातीला श्रीमंत अन् नंतर मध्यमवर्गीयांमध्ये मानाचं स्थान मिळवून होती. उत्तरार्धात मात्र कर्मचारी वर्गाची गरजेचं साधन झाली होती. पुणे, अहमदाबाद ही शहर तर सायकलींची शहरं म्हणून ओळखली जायची. आता मात्र पुन्हा एकदा जिम मध्ये सायकल चालवणे श्रीमंतीचे लक्षण झाले आहे.

आज दहावी पास झाल्यावर हमखास अपेक्षित पुरस्कार मोबाईल असला तरी आमच्या काळात ११ वी म्हणजे एस एस सी पास झाल्यावर पारितोषिक म्हणून मिळणारी सगळ्यात महागडी वस्तू. आणि त्यासाठी परिक्षा संपल्यावर सायकल शिकण्यासाठी एकच धडपड असायची. आजकाल नातवंडे ७/८ वर्षाचे होईपर्यंत २/३ सायकलींची विल्हेवाट लावलेली असते. कैची, लंगडी, दांडी असे अनेक प्रकार शिकून सायकल स्वार होता यायचं. आताच्या अल्फा जनरेशनच्या बालकांना हे माहीत नाहीच मुळी.

त्या काळात प्रेम हे समोरच्या दांड्यावर अर्थात सायकलच्या सीट व हॅंडल हे जोडणारा लोखंडी रॉडवर बसवून होत असे. चित्रपटात ही हिरो हिरोईन सायकल वर बसून प्रेम गीत आळवत असलेले ६० /७० च्या दशकात बघायला मिळायचे. हिरो सायकल वर बसून हिरोगीरी करत असे.

मनोजकुमार ‘शोर’ ह्या चित्रपटात अखंड ४/५ दिवस सायकल चालवून पैसे कमवताना दाखवले आहे. आणि तसे वास्तविक ही होते. गावात असे सायकल वीर येऊन अखंड सायकल फिरवत आपल्या जीवनाची सायकल रेटत असे. सायकल दुरुस्तीची दुकान चौका चौकात आढळायची. त्याकाळी ॲंबेसडर कार आणि सायकल दोन्ही उपलब्ध होती. ॲंबेसडर कार उच्च श्रीमंत वर्ग व ॲंबेसडर सायकल निम्न मध्यमवर्गीय माणसाला खरेदी करताना सारखं समाधान देत असे.

सायकलवर बसवून मुली पळवल्याची अजून तरी केस कुठल्याही पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे असं घडलं नाही. हो मुलगी मोटारसायकल 🏍️वरून पळवून नेली जावू शकते हे चिंटूने बाॅबी या चित्रपटात डिंपलला पळवून त्यावेळच्या तरुण पिढीला शिकवले. देवानंद व मुमताज यांनीही *तेरे मेरे सपने* या चित्रपटात आपले स्वप्नमय प्रेम सायकलवर स्वार होऊन बघीतले.

अशी ही सायकल निसर्ग व आरोग्य दोन्ही गोष्टींसाठी आवश्यक आहे. हल्लीच्या काळात सायकल ही जीम अर्थात व्यायाम शाळेत वा खेळांच्या मैदानात दिसते. सायकल हे दळणवळणाचे साधन राहिले नाही तर व्यायाम व स्पर्धेचे साधन झाले आहे.
सायकल एक संदेश देत असते.
सायकल सांगते
थांबयचे नाही
गरीबाची साथ
श्रीमंती नाही
इंधन न मागे, प्रदूषणही नाही
शिकवते जगायला
साधेपणा सोडायचा नाही…
असो तर अशा ह्या सायकल दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हो कमीत कमी आठवड्यातून एक दिवस सायकल फिरवून स्वतःचे शरीर चालते ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!