चैत्राम पवार यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे 1 जुलैला नाशिकमध्ये वितरण

भिलाजी जिरे (साक्री तालुका वार्ताहर)
साक्री (वार्ताहर) : तालुक्यातील पिंपळनेर पश्चिम भागातील आदर्श गाव बारिपाडा येथील पद्मश्री चैत्राम पवार यांना मुक्त विद्यापीठाचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
पद्मश्री चैत्राम पवार यांनी गेल्या ३५ वर्षापासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मुक्त शिक्षणाच्या क्षेत्रात भरीव योगदान देत आले आहेत.
मुक्त शिक्षणाची लोकचळवळ खेडोपाडी रूजविणारे मुक्त विद्यापीठ शिक्षण प्रसारासोबतच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही त्याच तळमळीने कार्य करीत आले आहे. येत्या १ जुलै २०२५ रोजी विद्यापीठ ३६ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. त्यानिमित्त महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांना या वर्षापासून ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ जीवन गौरव पुरस्कार’ देवून सन्मानित करण्यात येणार आहे.

पर्यावरण आणि वन संवर्धनाच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानाकरिता विद्यापीठाच्या निवड समितीने पद्मश्री चैत्राम पवार यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड केली आहे. शेती, पाणी, पर्यावरण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देवून बारीपाड्यासारख्या गावाचे रूप पवार यांनी लोकसभागातून पालटले. देशाला एक नवा बारीपाडा पॅटर्न दिला. त्याबद्दल नुकतेच पद्मश्री सन्मानानेही केंद्र शासनाच्या वतीने गौरविण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ३६ व्या वर्धापनदिनाच्या समारंभात ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे
सकाळी १०.३० वाजता जीवनगौरव पुरस्कार पद्मश्री चैत्राम पवार यांना प्रदान करण्यात येणार असल्याचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे. चैत्राम पवार यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.




