एकात्म मानवतावाद अंगीकारल्याशिवाय सर्वांगीण विकास अशक्य
प्रा.धनवटे : पंडित दीनदयाळ उपाध्याय हीरक महोत्सवी जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन



मोखाडा : शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या सर्वांचा मिळूनच खऱ्या अर्थाने माणूस असतो. एकात्म भाव असलेला मनुष्य धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ साध्य करतो. कर्तव्य पार पाडताना राष्ट्रहितालाच सर्वोच्च मानले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. साहेबराव धनवटे यांनी केले. ते पंडित दीनदयाळ उपाध्याय हीरक महोत्सवी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात “एकात्म मानव दर्शन” या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ निदेशक विजय खंदारे होते.


प्रा. धनवटे पुढे म्हणाले की, आपण हक्कांबाबत जागरूक असतो, तसेच कर्तव्याबाबतही जबाबदार राहिले पाहिजे. व्यक्ती, समाज आणि राष्ट्र या तिन्ही पातळ्यांवर समन्वय साधला तरच सर्वांगीण विकास साधता येईल. दीनदयाळ उपाध्यायांचे एकात्म मानव दर्शन हे केवळ तत्त्वज्ञान नसून ते जीवनाचे आचारधर्म आहे. सध्याच्या काळात सर्वच स्तरावर आत्मनिर्भर होणे आणि पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम मुळे यांनी केले, तर प्रवीण सरगर यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.




