गणेशोत्सवाला जनजागृतीची जोड हवीच
संगीता शामकांत मुसळे, नाशिक


गणेशोत्सव म्हटला की, सगळ्यांचा आनंद अगदी ओसांडून वाहतो. दहा दिवसांसाठी बाप्पा आपल्या भूतलावर आपल्या सोबत येऊन राहतात. अगदी आपल्या घरी येऊन राहतात. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सुरुवात केली. जनजागृती होणे हे त्यामागील प्रथम उद्दिष्ट होते. टिळकांचा उद्देश लक्षात घेऊनच आपण गणेशोत्सव साजरा केला पाहिजे. आताची परिस्थिती पाहता ग्लोबल वार्मिंग लक्षात घेतले पाहिजे. पर्यावरणपूरक अशाच गणपती मूर्ती बनवायला हव्यात. बाप्पाचे मखर ही पर्यावरणाला हानी पोहचणार नाही असेच हवेत.

मानवाच्या जीवनात किती आधुनिकता आली आहे, त्याचा सदुपयोग करायला हवा. डीजे वाजवून, हलकल्लोळ माजवून आनंद साजरा करणे ह्यापेक्षा वेगळा मार्ग निवडायला हवा. नेत्रतपासणी, आरोग्य चिकित्सा ह्यासारखे उपक्रम राबवायला हवेत. गरजूंना मदत करुन जो आनंद मिळ्तो, तो आनंद अनुभवायला हवा. रक्तदानासारखा कार्यक्रम घेता येईल. नेत्रदानाचे, देहदानाचे महत्व लोकांना पटवून देता येईल. दान हे नेहमीच फक्त पैसा, कपड्याचा रूपांत च होते असे नाही तर शाब्दिक आधार देऊनही दुःखितांना मदत होऊ शकतो. दु:खितांच्या चेहऱ्यावर हसू आणले तर तो परमानंदच होय.
दुसऱ्यांच्या आनंदात
आनंद मानणे
मानवा तंत्र नवे
आत्मसात करणे
महिला मुलींसाठी एक उत्तम असा प्रबोधनात्मक, मार्गदर्शनात्मक कार्यक्रम तर अवश्य राबवला जाऊ शकतो. ज्यात त्यांना त्यांच्या स्वसंरक्षणाचे धडे देता येतील. आजची ऑनलाईन पेमेंट आणि त्या संदर्भात होणारी फसवणूक ही तर अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण एखादी नाटिकेच्या रुपांत समाज मनावर बिंबवू शकतो.
असे किती आणि काय समाजोपयोगी उपक्रम आपण गणेशोत्सवात राबवू शकतो आणि ख-या अर्थाने आधुनिक गणेशोत्सव साजरा करु शकतो.
गणेशोत्सव साजरा
करुया आधुनिकरुपे
बाप्पा सुप्रसन्न होई
आशीर्वचने देई नानारुपे.




