नाशिकमधील रणरागिणी मराठा महिला मंडळ
आमची किटी पार्टी : सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या महिलांनी उभा केलेला माणुसकीचा झरा

2019 मध्ये 17 जानेवारीला झालेली सुरुवात… 6 वर्षांपासूनचा… मैत्रिणींचा ग्रुप… सगळ्या जणी चाळिशीत आलेल्या. एवढी वर्षे प्रत्येक वेळी नेहमी भेटत नसल्या तरी फोन/ईमेलवरून संपर्क होता. मात्र काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशाने रणरागिनी मराठा महिला मंडळाची स्थापना झाली. हे मंडळ स्थापन करण्यामागे बरेचसे उद्देश होते… त्यात सामाजिक, आर्थिक त्याचप्रमाणे समाजातील सर्व महिला एकत्र येण्यासाठी आणि मनमोकळ बोलण्यासाठी असे मंडळ असावे, असं मला वाटलं आणि मी हा विचार आपल्या काही मैत्रिणींसमोर ठेवला आणि सर्वांनीच त्याला होकार दिला. आणि ह्या मंडळाची स्थापना झाली.

यामध्ये दरवर्षी एक सामाजिक उपक्रम राबवायचा. त्याचप्रमाणे आपल्या मंडळामधील ज्या लघुउद्योजिका आहेत, त्यांना सहकार्य करायचे आणि त्यांच्यासाठी दरवर्षी एक प्रदर्शन भरवायचे. त्यांना जास्तीत जास्त संधी द्यायची. आपल्या समाजासाठी एक वधू-वर मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. दर महिन्याला भिशी घेतली जाते दोन हजार रुपये महिन्याप्रमाणे या भिशीचा फायदा बऱ्याच जणींचा होतो. प्रत्येक ग्रुपमध्ये 10 याप्रमाणे दहा ग्रुप तयार झालेले आहेत.

भिशी चालू करत असताना आम्ही ठरवले की, दहा सभासदांचा एक ग्रुप असावा आणि महिन्याला हजार रुपये घ्यावेत. ज्या सभासदाची भिशी लागेल त्यांनी तीनशे रुपये मंडळाला द्यावेत. ज्याच्यातून दर महिन्याला जे आपण स्नॅक्स देतो, त्याचा खर्च करता येईल. पहिल्या वर्षी तीनच ग्रुप झाले. त्यानंतर चार पाच हळूहळू वाढत जाऊन सहा ग्रुपचे गेल्या वर्षीपासून दहा ग्रुप तयार झाले. पाचशे रुपये प्रत्येकाने मंडळाला द्यावेत हे ठरले. त्यामुळे महिलाही वाढल्या आणि मिळणाऱ्या भिशीच्या रक्कम पण वाढली.

या वर्षीपासून दोन हजार रुपये महिना, अशी भिशीचे रक्कम ठरले. 500 रुपये घ्यायचे आहेत पण एकंदरीत जास्त पैसे हातात येतील आणि काही काम त्यातून होऊ शकते. ह्या सर्व जणींना अशी गोष्ट योग्य वाटली. परंतु काही जणींना दोन हजार रुपये जास्त वाटतात, त्यांच्यासाठी एक ग्रुप एक हजार रुपयांचाही ठेवलेला आहे…

एकंदरीत मंडळामध्ये भिशी ठेवण्याचा उद्देश सर्वांनी एकत्र येणे, त्याचप्रमाणे मंडळासाठी ही काही पैसे देणे आहे, अशा प्रकारे भिशी मंडळामध्ये सुरू झालेली आहे. दरवर्षी ग्रुप वाढत आहेत, पुढे चालून आम्ही 2000 हजार, 3000 हजार 5000 हजार अशा प्रकारे पण ग्रुप तयार करणार आहोत. ज्यांची जशी परिस्थिती आहे, त्याप्रमाणे त्या ग्रुपमध्ये त्यांनी सामील व्हावं म्हणजे जास्ती पैसे हातामध्ये येतात. पण हे पुढील भावी नियोजन आहे.

उपस्थित असेल तरच चिठ्ठी काढण्याचा नियम
जो भिशीला हजर असतो, फक्त त्याचाच नंबर काढला जातो हाही नियमच आहे. तसेच कोणीही स्वतःला गरज आहे म्हणून नंबर मागू नये आणि हवीच असेल तर ज्या सभासदाचा नंबर लागलाय तिच्याकडून तिने मागून घ्यावी असेही ठरलेले आहे. अशाप्रकारे भिशीमुळे मदतही होते आणि मजा येते. मंडळ छोटे जरी असलं तरी त्याच्यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व मैत्रिणी मनापासून सहकार्य करणाऱ्या आहेत. त्यामुळे कुठलंही सामाजिक कार्य दरवर्षी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये करू शकतो.

सामाजिक जबाबदारी पुढे नेताना
आत्तापर्यंत आम्ही दरवर्षी शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके कंपास त्याचप्रमाणे युनिफॉर्म इत्यादी देत आहोत. रेंडाळे येथे आम्ही हरणांसाठी पाणी प्रकल्पासाठी मदत केलेली आहे. महिला दिनाच्या निमित्ताने गरीब महिलांना नवीन साड्यांचे वाटप केलेले आहे. त्याचप्रमाणे घरकुल मधील दिव्यांग मुलींसाठी आम्ही मदत केलेली आहे .त्याचप्रमाणे दरवर्षी आपण दहावी बारावी मध्ये 75% च्या पुढे मार्क घेणाऱ्या मंडळातील सभासदांच्या पाल्यांना आपण ट्रॉफी त्याचप्रमाणे कॅश बक्षीस देतो व त्यांचे कौतुक करतो .मराठा समाजातील गरीब शेतकऱ्यांच्या मुलीसाठी आपण मदत करतो.

यावर्षी एक वाशिंग मशीन मंडळाकडून भेट दिलेली आहे तसेच कोविडमध्ये शिलाई मशीनही दिलेली आहे. अशा प्रकारे सामाजिक उतराई होण्याचा प्रयत्न हे मंडळ करत असतं. हे मंडळ सतत मदतीसाठी कार्यरत राहावं, याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय.
(अध्यक्षा : स्नेहलता मोरे, रणरागिणी मराठा महिला मंडळ, नाशिक)

माहिती पाठवण्यासाठी आवाहन…
आमची किटी पार्टी…
✍🏻सामाजिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून किटी पार्टीच्या निमित्ताने सामाजिक चळवळ भक्कम करणाऱ्या महिला मंडळ सदस्यांनी आपल्या मंडळांची यशोगाथा नक्कीच पाठवा… सोबत मंडळातील महिलांचे, उपक्रमांची छायाचित्रे आवर्जून पाठवावीत. नक्कीच आपल्या किटी पार्टीच्या उपक्रमाची माहिती प्रसिद्ध केली जाईल.
📞7720030574 या व्हाट्सअप क्रमांकावर सविस्तर माहिती पाठवा.



