महिला

आई माझी सुखाची नौबत

सरला संजय मोते (सामाजिक कार्यकर्त्या, पिंपळगाव बसवंत)

आई – वडील म्हणजे आपल्याला आयुष्य जगण्यासाठी देवांनी दिलेले पाठबळ. माझ्यासाठी माझी आई म्हणजे आयुष्याला साठवलेली पुण्याई तर वडील म्हणजे कंबर कसून आयुष्यभर मिळवलेली कमाई.
आई बापाची पुण्याई
लेकरांच्या आड येते
जीवावरले संकट
क्षणामध्ये दूर होते

माझी आई मंजुळा म्हणजे जणू रामासोबत आयुष्यभर साथ देणारी सीतामाता. माझ्या आईचं बालपण अगदी हलाखीचं गेलं. आईचे वडील तिच्या लहानपणीच वारले होते. लहानपणीच तिला तिच्या आईसोबत इतरांच्या शेतात काम करायला जावं लागलं. त्यामुळे तिचं शिक्षण झालं नाही. तिनं सारं आयुष्य कष्टात घालवलं. दिंडोरी तालुक्यातील वरखेडा हे तिचं माहेर. दोन भाऊ व दोन बहिणींमध्ये आईचा नंबर चौथा.
सन १९६० साली आई पिंपळगावच्या देशमानेंची सून झाली. तेव्हापासून एकत्र कुटुंबात सासू व नंतर मोठ्या जावेच्या हाताखाली सारी कामे करत असे.
सकाळी भल्या पहाटे लवकर उठून अंघोळीसाठी सर्वांना बंबात पाणी तापवायचं, गाई-गुरांचे शेण काढायचे, माती जमवून घर लिपायचं, सर्वांचा स्वयंपाक चुलीवर करुन घर, भांडी सगळे आवरायचे. डोक्यावर दुपारचं जेवण घेऊन शेतात जायचं. दिवसभर शेतात काम करायचं. हा आईचा नित्यक्रम.
घरात नेहमीच पाहुण्यांचा राबता असायचा. पण कोणीही कधीही उपाशी जाणार नाही असे हे राम – मंजुळा दांपत्य.

अन्नधान्याच्या हृदयी दिवा अखंड तेवतो।
राघुमैनेच्या कष्टाला देव विठ्ठल पावतो।
पाच भावंडं सांभाळताना व घरातील सर्व कामे करताना तिची धांदल उडत असे. पण कधीही कामाचा कंटाळा करतांना दिसली नाही. कामे करूनही ती नेहमी उत्साहीच दिसायची. सर्व कामे वेळेत करायची सवय तिला होती. आईचा स्वभाव अत्यंत प्रेमळ,भोळा व कष्टाळू. घरातील सर्वांची काळजी ती घ्यायची.
आईवडिलांनी केलेले काबाडकष्ट मी स्वतः डोळ्यांनी पाहिले आहे. नाफेड मागील मळ्यात दररोज तीन किलोमीटर अंतर पायी जायचे व परत घरी यायचे.
भावंडे शाळेत जात त्यामुळे आम्ही गावातच शिवाजीनगरमध्ये राहत असत. आई मला दररोज केसांना चांगले तेल लावून दोन वेण्या घालून रिबिनी लावून देत असे. रविवारी तिला खूप कामे असायची तरीही रविवारी मात्र दगडाने चांगले अंग घासून अंघोळ घालून द्यायची. घर सारवायची. रविवारी आठवड्याचा बाजार एकटी डोक्यावर आणायची. आई मळ्यातील गाईंचे शेण गोळा करून दररोज गोवऱ्या थापत असे. तिसऱ्या प्रहरी स्वयंपाकासाठी गोवऱ्यांची मोठी पाटी डोक्यावर घेऊन तीन कि मी. येणारी माझी आई . आईचा पदर धरून मी तिच्या मागे-मागे चालायची. मला हा प्रसंग आजही स्पष्ट आठवतो.


आई लिहिता वाचता येत नसल्याची खंत ती आजही व्यक्त करते व पुढील पिढीने भरपूर शिकावे असा मनोदय ती व्यक्त करते. आईला वाचता येत नसले तरी तिचे अनुभव दांडगे आहेत.
जरी न शिकली चार अक्षरे
तरी घरात तान्हुल्याचे
विद्यापीठही संस्काराचे
होऊनिया वावरते आई॥

कोणतीही दिनदर्शिका तिने वाचलेली नाही. तरीही आई येणारे सण वार , तिथी, मराठी महिना, पौर्णिमा, अमावस्या, एकादशी केव्हा आहे हे सारे अचूक सांगते.

जगण्यात मौज आहे; जीवन जगून पाहा…
हसण्यात आनंद आहे; निखळ हसून पाहा…
प्रेम समर्पित आहे; समर्पित होऊन पाहा…
त्यात सामर्थ्य आहे; त्याग करून पाहा…
कर्तव्यात ईश आहे; कर्तव्य करून पाहा…
आई ब्रह्मांड आहे; जरा न्याहाळून पाहा…

असे हे सारे ब्रम्हांड मला माझ्या आईमध्ये बघायला मिळाले. अशी प्रेमळ आई मला पुन्हा पुन्हा लाभावी. देवाला सगळ्या घरात जन्म घेता आला नाही म्हणूनच त्याने प्रत्येक घरात आई निर्माण केली. याची प्रचिती मला आली.
(लेखिका सरला संजय मोते या साहित्यिक असून महिला सक्षमीकरण चळवळीत तसेच सामाजिक कार्यातील त्यांचे सक्रिय योगदान असते.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!