दीपक पाठकच्या विमान अपघातातील मृत्यूने नैताळे गावावर शोककळा
नैताळे येथील सुपुत्र आणि को. पायलट दीपक पाठक यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू

अहमदाबाद विमान दुर्घटना

निफाड : गुजरातमध्ये अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात विमानातील 241 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला तर एक प्रवासी चमत्कारिकरित्या बचावला असल्याची माहिती समोर आली आहे. अहमदाबाद येथील दुर्घटनेने संपूर्ण जगात शोककळा पसरली असून मूळचे नैताळे येथील सुपुत्र आणि सध्या बदलापूर येथे वास्तव्यास असलेले दीपक पाठक यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे.

निफाड तालुक्यातील नैताळे गावचे सुपुत्र असलेले आणि को.पायलट म्हणून जबाबदारी सांभाळत असलेले तसेच सध्या बदलापूर येथे वास्तव्यास असलेले दीपक पाठक यांचा अहमदाबाद विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. अतिशय दुःखद आणि समाजमन हेलावणारी ही घटना म्हणता येईल. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत स्थायिक झालेले पाठक कुटुंबातील सदस्यांचा शेती, भाऊबंदकी नैताळे येथे असल्याने पाठक परिवाराचे नेहमीच गावाशी येणे जाणे आहे. यात्रा उत्सावातही सहभागी होणाऱ्या कुटुंबातील दीपक पाठक यांच्या अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्याचे समजताच गावात दुःख व्यक्त होत आहे. दीपक पाठक यांच्या आणि त्यांच्या पाठक परिवाराच्या गावाशी असलेल्या संपर्काबद्दल नैताळे गावातील सामाजिक कार्यकर्ते भाऊ दराडे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र बोरगुडे यांनी आठवणींना उजाळा दिला.
को.पायलट दीपक पाठक यांना भावपूर्ण श्रद्धांजली…





