उद्योग व व्यवसाय

वाळवलेल्या भाजीपाला पावडरने दिला रोजगाराचा मार्ग

पळासखेडे येथील वंदनाताई पाटील यांच्या धडपडीला "उमेद"चे बळ

जळगाव जिल्ह्यातील पहिलाच भाजीपाला डिहायड्रेशन प्रकल्प

स्वतःवर असलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर जगात काहीही अशक्य नाही… असे मनाशी ठरवून अनेक जण स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत असतात. व्यवस्था बळकट करतानाच आपल्या सभावतालच्या लोकांनाही भक्कम उभे करण्यात पुढे असलेल्या घटकांमध्ये नाव घेता येईल अशा जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात असलेल्या पळासखेडा येथील रहिवासी वंदनाताई पाटील यांची यशोगाथा नक्कीच प्रेरणादायी आहे...

वंदनाताई पाटील यांनी सुरुवातीला गावातील महिलांना एकत्र आणत बचतगटाची सुरुवात केली. ‘उमेद’ अभियानाच्या सहकार्याने सर्वसामान्य बचतगटांच्या बिजनेस प्लॅनप्रमाणे उडीद पापड, लिंबु क्रश लोणचे, भाजणी चकली, आवळा पावडर, आवळा अर्क असे पदार्थ बनवायला सुरुवात केली. जळगाव जिल्ह्यातील विविध प्रदर्शनांसोबतच मुंबई, नाशिक, पुणे इ. मेट्रो शहरांमध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन आपले पदार्थ विक्री सुरू केली. ग्राहकांना कोणते पदार्थ हवे आहेत आणि मार्केटमध्ये नेमके काय विक्री होईल, याचा अंदाज घेऊन सातत्याने अभ्यास चालू ठेवला. यातूनच मग पुढे जाऊन भाजीपाला डिहायड्रेशनसारखा नवा व्यवसाय त्यांनी सुरू केला. आज रोजी त्यांचे हे सर्व डिहायड्रेटेड प्रोडक्ट ऑनलाइनसोबतच शहरी बाजारपेठेत विकले जात आहेत. आता त्यांच्या बचतगटाची वाटचाल ही फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापनेपर्यंत पोहोचली आहे.
(लेखन आभार : जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव)
पापड उद्योग

वंदनाताई व त्यांच्या गावातील महिलांनी मिळून कायमस्वरूपी रोजगाराचे साधन हाताशी असावे म्हणून उडीद पापड निर्मिती सुरू केली. सोबतच लिंबु क्रश लोणचे, भाजणी चकली, आवळा पावडर, आवळा अर्क असे पदार्थ बनवायचा व्यवसाय पळासखेडा गावात सुरू केला. त्यांच्याकडील हाताने तयार केलेल्या पापडांना स्थानिक पातळीवर चांगली मागणीदेखील होती. आपल्या उत्पादनांना ठिकठिकाणी भरणाऱ्या प्रदर्शनांच्या माध्यमातून चांगली मोठी बाजारपेठ मिळण्याची खात्री झाल्यावर त्यांनी अशा प्रदर्शनात सहभागी होण्याचा सपाटाच लावला. जळगाव जिल्ह्यातील विविध प्रदर्शनांसोबतच मुंबई, नाशिक, पुणे इत्यादी मेट्रो शहरात होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन आपले पदार्थ विकणे सुरू केले. यातून उत्पादनांच्या विक्रीसोबतच विविध मार्केटचा अभ्यास होऊ लागला. ग्राहकांना कोणते पदार्थ हवे आहेत आणि मार्केटमध्ये नेमके काय विक्री होईल, याचा अंदाज आल्याने नव-नवीन उत्पादने तयार करण्याची त्यांना प्रेरणा मिळू लागली.

जिल्ह्यात फळभाज्या निर्जलीकरणाची मुहूर्तमेढ

साधारणपणे महिला बचतगट हे पारंपरिक पदार्थ तयार करून त्यांची विक्री करण्यावर भर देतात. मात्र सुरुवातीपासूनच वंदनाताईंनी स्थानिक बाजारपेठेतील ग्राहकांपेक्षा मेट्रो शहरातील मार्केटमध्ये कोणता माल खपतो व त्या ग्राहकांना नेमकी कोणती उत्पादने हवी आहेत, यानुसार आपल्या बचतगटाद्वारे उत्पादने तयार करण्यावर भर दिला. यातूनच काळाची गरज ओळखून त्यांनी आपल्या भागात सहज उपलब्ध असलेल्या फळे व भाजीपाला यावर प्रक्रिया करण्यासह निर्जलीकरण अर्थात डिहायड्रेशन प्रोजेक्ट सुरू केला. अशा प्रकारचा महिला बचतगटामार्फत सुरू झालेला हा जिल्ह्यातील पहिलाच प्रकल्प ठरला. त्याचवेळी अनेकांनी या प्रकल्पातून निर्माण झालेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळणार नाही, अशी शंका व्यक्त केली. मात्र मार्केटचे निरीक्षण व बाजारपेठेचा सूक्ष्म अभ्यास असल्यामुळे वंदनाताई आपल्या ध्येयापासून जराही विचलित झाल्या नाहीत. कृषी विज्ञान केंद्राकडून रीतसर प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण घेऊन त्यांनी सोलर ड्रायरच्या माध्यमातून भेंडी, टोमॅटो, ताकात भिजवलेली हिरवी मिरची, कारली आदींचे फ्लेक्स तयार करून निर्जलीकरणास सुरुवात केली. याचबरोबर आले, बीट, शेवगा, कांदा, पुदिना, लसूण पावडर आणि शेवगा शेंगांचे निर्जलीकरण केलेले तुकडे इ. पदार्थ बनवायला सुरुवात केली. लोणचे व पापड विक्रीमुळे राज्यभर झालेला थेट ग्राहकांचा संपर्क या नवीन उत्पादनांच्या विक्रीसाठी कामी आला. बघता-बघता डिहायड्रेटेट उत्पादनांचे मार्केट निर्माण होत गेले. उत्पादन प्रक्रियेत सातत्य आणि गुणवत्ता राखल्यामुळे ग्राहक जुळत गेले. मार्केटिंगसाठी सोशल मीडियाबरोबरच विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मची मदत त्यांनी जाणीवपूर्वक घेतली.

शेतमालाची बांधावर खरेदी

फळभाज्या निर्जलीकरण प्रक्रिया उद्योगासाठी लागणारा कच्चा माल हा स्थानिक शेतकऱ्यांकडूनच खरेदी केला जातो. मार्केटमधील प्रचलित दरानुसार थेट बांधावर खरेदी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च तर वाचतोच, सोबतच बाजार समितीमधील अडत, हमाली हा खर्चदेखील वाचतो. शिवाय शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाचा पूर्ण मोबदला मिळतो. वंदनाताईंनी आपल्या प्रक्रिया उद्योगाच्या गरजेनुसार लागणाऱ्या शेतमालाची शेतकऱ्यांकडे आगाऊ नोंदणी करायलादेखील आता सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ निर्माण होत आहे.

शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना

फळभाज्या निर्जलीकरण प्रक्रिया उद्योगातून वंदनाताईंनी आपल्या बचतगटाचा आर्थिक पाया मजबूत केला असून, सध्या दर महिन्याला २ ते २.५ लाख रु.ची उलाढाल केली आहे. यातून महिन्याला खर्च वजा जाता सरासरी ४० ते ५० हजार रु. निव्वळ नफा त्यांना मिळतो. या प्रकल्पामुळे गावातील १० ते १५ महिलांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला आहे. व्यवसायवाढीला गती देण्याची आवश्यकता असल्याने त्यांनी ३०० महिला सभासद घेऊन गावातच गायत्री शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना नुकतीच केली आहे.

डिहायड्रेटेड भाजीपाला पावडर व फ्लेक्स
शेवगा, टोमॅटो, अद्रक, लसूण, कांदा, बिट, कढीपत्ता, पुदिना, केळफुल पावडर आणि फ्लेक्स ग्राहकांना कोणते पदार्थ हवे आहेत आणि मार्केटमध्ये नेमके काय विक्री होईल, याचा अंदाज घेऊनच उत्पादने तयार करायला हवीत. गरजेनुसार नवीन उत्पादने तयार करायला शिकणे गरजेचे आहे. गावातच विकेल अशी मानसिकता न ठेवता जगात विकले जाईल असे प्रोडक्ट बनवायला हवे, अशी मानसिकता वंदनाताईंनी तयार केली आहे.

आपली उत्पादने विक्रीसाठी केवळ जनसंपर्क, प्रदर्शने, कार्यक्रम इ.वर अवलंबून न राहता सोशल मिडिया व ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा वापर वंदनाताईंनी सुरू केला आहे. त्यातूनच नवनवीन ग्राहक जोडले जात आहेत.
प्रक्रिया उद्योगातील संपूर्ण प्रक्रियेमध्ये स्वच्छता ठेऊन दर्जेदार उत्पादन निर्मिती केली जाते. सोबतच प्रत्येक उत्पादनाचे पॅकेजिंग हे आकर्षक व मोठ्या बाजारपेठेतील उत्पादनांप्रमाणे स्टैंडर्ड असेल अशी काळजी वंदनाताई घेतात. खरे तर हेच वंदनाताईंच्या यशाचे रहस्य आहे.

महिलांना रोजगार देण्याचे ध्येय
गावातील सर्व महिलांना सुरुवातीला बचतगटाच्या व आता आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून एका छताखाली आणून हक्काच्या रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न वंदनाताई करत आहेत. आता हा बचतगट व शेतकरी उत्पादक कंपनीच गावाच्या अर्थकारणाचा मुख्य कणा झाला आहे. या बचतगटाचे गेल्या काही वर्षांमध्ये अत्यंत वेगवान व देदीप्यमान अशी कामगिरी केली आहे. याचे संपूर्ण श्रेय हे वंदनाताईंच्या गतिशीलतेला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्य शासनाच्या अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासह असंख्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून त्यांच्या गटाला बीज भांडवल मिळाले असून, कृषी विभागाच्या केंद्र शासन साहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत गटाची निवड झाली आहे. ‘बचतगट ते फार्मर प्रोड्युसर कंपनी’ अशी अविरत वाटचाल व ‘अखंड गतीतून सार्थकता’ हे ब्रीद लक्षात घेऊन चालणाऱ्या वंदनाताईंची ही यशोगाथा नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!