
आयटीआयने दिलं युवकांच्या स्वप्नांना बळ
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) तरुणांना विविध औद्योगिक ट्रेडची कौशल्ये शिकविली जातात. या संस्था शासकीय आणि केंद्र सरकारशी संलग्न खासगी अशा दोन प्रकारच्या आहेत. त्यांचा अभ्यासक्रम केंद्रीय पातळीवर ठरवला जातो. तो देशभर सर्वत्र समान असतो. महाराष्ट्रात शासकीय ४१९ आणि खासगी ५८५ संस्था असून, त्यांची प्रवेश क्षमता १ लाख ५१ हजार ६०४ इतकी आहे. यातील १५ संस्था फक्त मुलींसाठी चालविल्या जातात. आयटीआयमध्ये प्रवेश घेण्यासाठी वयाची अट नाही. प्रवेश ऑनलाईन पद्धतीने आणि गुणवत्तेनुसार दिला जातो, त्यासाठी शालांत परीक्षेत मिळालेले गुण विचारात घेतले जातात.
खासगी आणि सरकारी दोन्ही संस्थांमध्ये शासनाचे नियमाप्रमाणे आरक्षण लागू आहे. शासकीय संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व प्रवर्गातील उमेदवारांना दरमहा ५०० रुपये विद्यावेतन मिळते. काही आयटीआयमध्ये अत्यल्प शुल्कात वसतिगृह (निवास) उपलब्ध करून दिले जातात. अधिक माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.dvet.gov संकेतस्थळाला भेट द्यावी.
आयटीआयचे महत्त्व
सध्याच्या स्पर्धेच्या जगात रोजगार आणि स्वयंरोजगार मिळवणे एक मोठं आव्हान बनले आहे. तंत्रज्ञानाची प्रगती, नवे उद्योग, जागतिकीकरण आणि बदलत्या बाजारपेठेचा परिणाम या सर्व गोष्टींनी कौशल्याची मागणी वाढली आहे. याच कारणामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) महत्त्वाच्या ठरल्या आहेत. या संस्था प्रशिक्षणाथीना विविध तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्ये शिकवून त्यांना रोजगारक्षम करीत आहेत. शिवाय आयटीआयचे अभ्यासक्रम हे एक किंवा दोन वर्षांचे आहेत. ते पूर्णपणे प्रात्यक्षिकांवर आधारित असल्याने आयटीआयचे व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना रोजगाराच्या संधी अधिक आहेत. आयटीआय झालेल्यांना रोजगाराच्या विपुल संधी उपलब्ध आहेत.
हे आहेत अभ्यासक्रम
एअर क्राफ्ट मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, फिटर, मोटार मेकॅनिक, मशिनिस्ट, ट्रॅक्टर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, – वेगवेगळे ५९ ट्रेडचे प्रशिक्षण आयटीआयमध्ये दिले जाते. याबरोबरच सोलार टेक्निशियन, इलेक्ट्रिकल व्हेईकल मॅनेजमेंट, कृत्रिम प्रज्ञा (एआय), ड्रोन मेकॅनिक यांसारखे नवीन ट्रेडचे प्रशिक्षण या वर्षीपासून सुरू होत आहेत.
उच्च शिक्षणाच्या संधी
आयटीआयमधून दोन वर्ष व्यवसाय पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अभियांत्रिकी पदवीकेला थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळतो. त्यानंतर पदवी आणि पदवीत्तर पदवी त्यांना घेता येते. त्याचबरोबर दोन वर्षांचा आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना थेट बारावीच्या परीक्षेला बसता येते. या परीक्षेत इंग्रजी आणि हिंदी हे दोन विषय उत्तीर्ण होऊन बारावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळते आणि पुढे हव्या त्या शाखेत पदवी घेता येते.
हमखास मिळणार रोजगार संधी
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या उमेदवारांना नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय असे दोन्ही पर्याय असतात. विविध खासगी किंवा सरकारी कंपन्यांमध्ये या उमेदवारांना कुशल, अर्धकुशल कामगार, शिकाऊ उमेदवार महणून नोकऱ्या मिळतात. त्याचबरोबर केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये कायमस्वरूपी आणि प्रतिष्ठित रोजगार मिळतो. ज्या तरुणांना नोकरीऐवजी उद्योग सुरू करायचा असतो त्यांना स्वतःच्या कौशल्यावर आधारित उद्योग सुरू करता येतात, आयटीआयच्या प्रमाणपत्रावर राष्ट्रीयकृत व खासगी बँका कर्जही उपलब्ध करून देतात. आयटीआयमधील ट्रेडच्या शिक्षणावरोवरच काही संस्थांमध्ये जर्मन, जापनीज भाषा शिकवल्या जातात, या भाषा शिकलेल्या उमेदवारांना परदेशात नोकरीच्या मिळतात.
(साहेबराव धनवटे हे समुपदेशक, व्यवसाय शिक्षणाचे अभ्यासक तसेच प्रसिद्ध साहित्यिक आहेत.)





