“ज्येष्ठत्व ते श्रेष्ठत्व” — विज्ञान आणि अध्यात्माचा संगम : डॉ महेश करंदीकर
गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघ व भावसार क्षत्रिय समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमाला

गोविंदनगर (प्रतिनिधी) : येथील ज्येष्ठ नागरिक संघ व भावसार क्षत्रिय समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेतील पाचवे पुष्प अत्यंत चिंतनशील आणि प्रेरणादायी ठरले. कै रोहिणीताई रत्नपारखी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित व्याख्यानात सुप्रसिद्ध न्युरोसर्जन आणि विचारवंत डॉ. महेश करंदीकर यांनी “ज्येष्ठत्व ते श्रेष्ठत्व” या विषयावर मांडलेले विचार श्रोत्यांच्या हृदयाला स्पर्शून गेले.
मेंदूची कार्यपद्धती, वयानुसार त्यात होणारे बदल, आणि त्यासोबत येणारे भावनिक व आध्यात्मिक रूपांतर यांची वैज्ञानिक पद्धतीने उकल करत असताना, त्यांनी अध्यात्माची नितांतसुंदर सांगड घातली.
डॉ. महेश करंदीकर यांचे व्याख्यान ठरले अंतर्मुख करणारे ज्येष्ठतेला अभिमानाने स्वीकारून, त्यातून “श्रेष्ठत्व” साध्य कसे करता येते, हा विचार व्याख्यानातून अमृतासारखा श्रोत्यांच्या मनात झिरपला.
“ज्येष्ठत्व म्हणजे थांबणं नाही, तर नव्या समजुतींचं उगमस्थान आहे,” असे सांगताना त्यांनी मेंदूतील न्यूरोप्लॅस्टिसिटीपासून ते आत्मिक शांतीपर्यंतचा प्रवास सहज भाषेत उलगडला.
त्यांनी वयानुसार येणारे एकाकीपण, विस्मरण, आणि मानसिक घडामोडी, भावनिक बद्धकोष्ठता यांचा केवळ चिकित्सक दृष्टिकोनातून नव्हे, तर एक संवेदनशील माणूस म्हणून विचार मांडला. व्याख्यानात विज्ञानाची खोली आणि अध्यात्माची उंची यांचा अपूर्व संगम प्रेक्षकांनी अनुभवला.
श्रोत्यांनी व्याख्यानाच्या शेवटी उभे राहून टाळ्यांच्या गजरात आपल्या भावना व्यक्त केल्या. गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आणि साहित्यिक ओमप्रकाश शर्मा यांनी संघाच्या वतीने डॉ. करंदीकर यांचा सन्मान केला.
भावसार क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष श्री संजय प्रयागे , विश्वास को- ऑपरेटीव्ह बॅंकेचे अध्यक्ष श्री विश्वास ठाकूर आणि डॉ अश्विनी ताई बोरस्ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्री अशोक देवरे यांनी सुत्र संचालन केले तर श्री प्रकाश पवार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.




