योगशास्त्रातील प्रथम अंग- यम
ओमप्रकाश शर्मा, सामाजिक कार्यकर्ते, नाशिक.


योग ही भारताची अतिप्राचीन व अमूल्य अशी आध्यात्मिक धरोहर आहे. ‘योग’ म्हणजे मन, वाणी व क्रियांची एकाग्रता, आणि परमात्म्याशी एकरूप होण्याचा मार्ग. पतंजली ऋषींनी ‘योगसूत्र’ या ग्रंथात योगाची आठ अंगे सांगितली आहेत – यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. या पैकी पहिले अंग म्हणजे *यम* ( रेड्यावर बसून येणारा नव्हे)– हा योगसाधनेचा नैतिक आणि आत्मिक पाया असून मुख्यत्वे कोणत्या गोष्टींपासून दूर रहावे हे प्रतिपादन केले आहे.
यम (Yama): बाह्य आचरण धर्म – विशेष म्हणजे “काय करु नये?” यांची व्याख्या सांगितली आहे.
‘यम’ हे आत्मसंयमाचे नियम आहेत. दैनंदिन व्यवहारात, समाजात वावरताना आणि स्वतःमध्ये समरसता/ एकसुत्रता नांदावी म्हणून यमांचे पालन करणे आवश्यक आहे. पांच यम तत्वे खालीलप्रमाणे आहेत.

1. अहिंसा (Non-violence) – कोणत्याही जीवाला कृती, वाणी किंवा मनाने त्रास न देणे. हे फक्त मारहाण न करणे नाही, तर द्वेष, राग, सूड यांपासूनही दूर राहणे आवश्यक आहे. वाचेने सुद्धा कुठल्याही जीवाला त्रास देऊ नये.
2. सत्य (Truthfulness) – नेहमी खरे बोलणे, पण ते बोलणे दुसऱ्याच्या हितासाठी असावे. कटु सत्यही प्रेमपूर्वक व निर्भयतेने बोलले गेले पाहिजे.
3. अस्तेय (No-stealing) – चोरी न करणे, म्हणजे केवळ वस्तूंची नव्हे, तर दुसऱ्याच्या श्रमाची श्रेयाची, वेळेची, कल्पना चोरणे टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
4. ब्रह्मचर्य (Celibacy / Sense control) – इंद्रियांचे संयम पाळणे. याचा अर्थ संन्यास नसून, विषयांवर नियंत्रण ठेवणे, शरीर, मन व बुद्धी अर्थात ज्ञान उर्जेचा उच्च व पवित्र उद्दिष्टांसाठी उपयोग करणे.
5. अपरिग्रह (Non-possessiveness) – अनावश्यक वस्तू, लोभ, संग्रह प्रवृत्तीपासून दूर राहणे. जितके आवश्यक, जरुरीचे तितकेच जवळ ठेवणे वा बाळगणे.

योगाचे तिसरे अंग आहे योगासन.
शरीर-मन-आत्म्याची समरस साधना म्हणजे योगासन.
भारतीय ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी एक असे शास्त्र निर्माण केले, ज्याने केवळ शरीरच नव्हे तर मन, बुद्धी आणि आत्मा यांच्यात समरसता साधण्याचा मार्ग दाखवला आहे. ते शास्त्र म्हणजे योग. योगाचे तिसरे अंग म्हणजे योगासन.
योगासन म्हणजे काय?
“आसनं सुखमासनेत्” — पतंजली योगसूत्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे, ज्यामध्ये दीर्घकाळ स्थिर आणि सुखद अवस्थेत राहता येते, ती स्थिती म्हणजे आसन.
योगासन केवळ शारीरिक हालचालींची साखळी नाही, तर प्रत्येक आसनामागे एक मानसिक शांती, आत्मनियंत्रण आणि चैतन्याचा अनुभव लपलेला आहे.
योगासनांचे प्रकार:
योगासने अनेक प्रकारांची असतात, परंतु खालील प्रमुख गटांमध्ये त्यांचे वर्गीकरण करता येईल.
1. स्थिरता वाढवणारी आसने – उदा. ताडासन, वृक्षासन
2. पाचन सुधारणारी आसने – उदा. पवनमुक्तासन, भुजंगासन, वज्रासन
3. पाठदुखीत उपयोगी आसने – उदा. मकरासन, शलभासन, उष्ट्रासन
4. स्नायूंना लवचीकता देणारी आसने – उदा. त्रिकोणासन, पश्चिमोत्तानासन
5. ध्यानासाठी तयार करणारी आसने – उदा. पद्मासन, सुखासन
योगासनांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे ही करता येईल.
१. उभे राहून. उदा. सुर्य नमस्कार, ताडासन, इ.
2. जमीनीवर बसून, उदा. कोनासन, गोमुखासन, वक्रासन इ.
3. वज्रासनात, उदा. मंडुकासन, शशकासन इ.
4. पोटावर झोपून. उदा. भुजंगासन, धनुरासन, शलभासन इ.
5. पाठीवर झोपून. उदा. पवन मुक्तासन, पादोत्तनासन, इ.
योगासने करण्याचे फायदे:
शरीर लवचिक व मजबूत होते
पाचनक्रिया सुधारते
श्वसनक्षमता वाढते
मानसिक तणाव कमी होतो
एकाग्रता व स्मरणशक्ती वाढते
झोपेची गुणवत्ता सुधारते
रुग्णांना थेरपीसारखा उपयोग होतो
योगासन करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी:
आसन नेहमी सकाळी, उपाशीपोटी करावीत.
सुरुवातीस मार्गदर्शकाच्या सल्ल्यानेच आसने करावीत
आक्रमक हालचाली टाळाव्यात
आसनानंतर शवासन/योगनिद्रा करणे आवश्यक आहे
योगासनात नियमितपणा आणि संयम हे यशाचे मूळ असते
योगासन ही केवळ शारीरिक व्यायामाची पद्धत नसून ती संपूर्ण जीवनशैली आहे. आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनात, योगासन म्हणजे आत्मशांतीकडे नेणारा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात किमान काही वेळ योगासनासाठी दिल्यास आरोग्य, आनंद आणि अंतर्बळ यांचा अमूल्य ठेवा आपल्याला लाभू शकतो.
शरीर हे आत्म्याचे मंदिर असून आणि योगासन हे त्या मंदिराची सजावट आहे. योगासनांची ही थोडक्यात माहिती वा ओळख करून दिली आहे. विविध आसनावर विस्तृत चर्चा यानंतरच्या लेखात सादर केली जाईल.




