एटीएममधून पैसे काढण्यास मदत करण्याच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक
नाशिकच्या जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लबतर्फे काळजी घेण्याचे आवाहन

वास्को : ज्येष्ठ नागरिकांच्या वयाचा आणि असहायतेचा गैरफायदा घेत अनेक ठिकाणी त्यांची फसवणूक होत असल्याच्या घटनांमुळे होणारी वाढ चिंतेचा विषय बनतोय. काही दिवसांपूर्वी पवई येथील सेवानिवृत्त प्राध्यापकाची साडेसहा कोटी रुपयांची मालमत्ता हडप करण्याचा प्रकार उघडकीस आला. गोव्यातही असाच फसवणुकीचा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. अशा वेळी ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांतर्फे वेळोवेळी करण्यात येत आहे.

एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या नावाखाली येथील एका ज्येष्ठ नागरिकाची व एका युवकाची एका अज्ञात व्यक्तीने फसवणूक केल्याच्या तक्रारी वास्को पोलीस स्थानकात करण्यात आल्या आहेत. या व्यक्तीने मेर्सीज वाडे येथील भास्कर (६४) यांच्या खात्यातून ५७ हजार रुपये तर मेस्तवाडा येथील दुर्गाप्पा (३०) याच्या खात्यातून ३० हजार रुपये काढल्याचे तक्रारींमध्ये म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेलेया माहितीनुसार, मेर्सीज वाडे येथे राहणारे भास्कर हे २६ जून रोजी वास्कोतील कॅनरा बँकेतील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. एटीएममध्ये आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने भास्कर यांना एटीएममधून पैसे काढण्यास मदत करण्याच्या बहाणा केला. त्यानंतर त्या व्यक्तीने भास्कर यांच्याकडे असलेल्या एटीएम कार्डची अदलाबदल केली. सदर अदलाबदल भास्कर यांच्या नजरेत आली नाही. त्यानंतर त्या अज्ञात व्यक्तीने भास्कर यांच्या एटीएम कार्डचा वापर करताना, एटीएममध्ये दोन व्यवहार करून ५७ हजार रुपये काढले. याप्रकरणी वास्को पोलीस स्थानकात तक्रार करण्यात आली.

अन्य एका घटनेत दुर्गाप्पा हा युवक २६ जूनला बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला होता. यावेळी त्या एटीएममध्ये आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्याला पैसे काढण्यासाठी मदत करण्याचा बहाणा केला. असे करताना त्याने दुर्गाप्पा याच्या एटीएम कार्डची अदलाबदल केली. त्या अज्ञात व्यक्तीने नंतर दुर्गाप्पा याच्या एमटीएम कार्डचा तीन वेळा वापर करून प्रत्येकी दहा हजार असे तीस हजार रुपये एटीएममधून काढले. दोन्ही घटनांबाबत उपनिरीक्षक प्लेटो कार्व्हालो तपास करीत आहेत.
ज्येष्ठ नागरिकांना नाशिकच्या जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लबतर्फे आवाहन… हे लक्षात ठेवा…
कोणत्याही संशयास्पद कॉल्स, मेसेजेस किंवा ई-मेल्सला प्रतिसाद देऊ नका.
तुमची ओळख नसलेल्या कोणत्याही व्यक्तींना तुमची वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती देऊ नका.
कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचे आमिष दाखवणाऱ्या योजनांपासून सावध रहा.
डिजिटल सुरक्षिततेबद्दल माहिती ठेवा आणि आवश्यकतेनुसार सायबर क्राईम हेल्पलाइन (1930) किंवा वेबसाइट (cybercrime.gov.in) वर संपर्क साधा.
संशयास्पद वाटल्यास आपल्या कुटुंबातील सदस्यांना किंवा विश्वासू व्यक्तींना माहिती द्या.





