माझी आई – सावित्रीचे रूप
सुशीला हेमचंद्र पिंपरीकर (सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कवयित्री, समाजसेविका, नाशिक)


आम्ही नऊ भावंडं. आई आमची आभाळ छत्र होती. झुळझुळत्या वात्सल्याचा झरा, आम्हा सर्वांना संस्काराच्या निर्मळ तुषारात न्हाऊ घालून प्रसंगी कठोर बनून शिस्त लावणारी होती. माझे वडील सुरुवातीला काही वर्षे शिक्षक होते. आईला त्यामुळे मास्तरीण बाई म्हणत. फक्त तिसरी शिकलेली जबरदस्त वाचन होते. रोजचे वृत्तपत्र वाचत असे. असंख्य भजने तोंडपाठ. आम्हा सर्वांना पाटीपेन्सिलने अ,आ,ई चे धडे सुरुवातीला तिनेच दिले.
कुटुंब मोठे. वडिलांनी नंतर त्यांच्या मामांच्या सांगण्यावरून शिक्षकाची नोकरी सोडली व मामांच्याच आडतदुकानी गुमास्ता म्हणून नोकरी केली. मामा गेल्यावर हीच नोकरी इतर व्यापा-रांकडे केली.अक्षर सुंदर, हिशेबाची जाण,प्रामाणिकपणा यामुळे व्यापारी स्वतः बोलवायचे. पण पगार तसा बेताचाच. त्यात भागत नव्हते म्हणून आईने सुपारी फोडणे, शेंगा फोडणे ही कामे घरकाम पूर्ण सांभाळून निदान भाजीपाला सुटेल म्हणून केली. दोघांनीही असलेल्या परिस्थितीत आदरातिथ्य सोडले नाही. दोन भाचे शिक्षणासाठी होते. एका दिराचं व नणंदेचं लग्न केलं. सासरे अंथरुणावर होते त्यांची सेवा केली. आईचे कष्ट आठवले कि शहारे येतात अंगावर.

वडील ज्योतिबा आणि आई सावित्रिची रूप होती. एवढ्या कठिण परिस्थितीत मुलगा मुलगी भेद न करता सर्वांना उच्च शिक्षित करून स्वावलंबी केले. घरात कोणत्याही कामाला बाई नाही. आम्हाला अभ्यासाला, काॅलेजला जायला वेळ द्यायची.
आज आम्ही सर्व भावंडे अतिशय सुखात आहोत. सर्वांकडे गाडी,बंगला आहे. त्याचे श्रेय आमच्या आईलाच आहे. कठीण परिस्थितीत तिने वडिलांना साथ दिली. आज ती नाही पण आमच्या तनमनात ती साठवली आहे. ती जवळच आहे असे वाटते आम्हाला तिने संघर्षाला तोंड द्यायला शिकवले,खंबीर बनवले. ती श्रमदेवी होती.
प्रत्येक सोहळ्यात तिचा आशीर्वाद लाभला. एका प्रकाशन सोहळ्यात महंत सुधीरदास यांचे हस्ते तिला सत्कार लाभला होता. आदर्श माता म्हणून डे केअर संस्थेने तिचा सन्मान कलेला. अशी आमची आई सरस्वती व लक्ष्मीचं रूप सुध्दा होती आमच्यासाठी. माझी व माझ्या यजमानांची पुस्तके प्रकाशित केली तेव्हा ती आनंदाने सहभागी होत असे. स्वतःचे मत बिनधास्तपणे व्यक्त करीत असे.
माय माझी दौलत
स्वर्ग संपदा कुडे
कुबेराची हिम्मत
फिकी त्यापुढे पडे
आई पवित्र गंगोत्री
न्हाऊनिया चिंब त्यात
जरी नाही तू सोबत
आसपास मी तुझ्यात
होऊ कशी उतराई
आई हवीस ग आई

📎 वाचकांना आवाहन…
(माझी आई या सदरासाठी आपणही लेख पाठवू शकता… सोबत आपल्या आईच्या, परिवाराच्या आठवणीतील दोन तीन फोटोही लेखासोबत पाठवा. अवश्य प्रसिद्धी दिली जाईल.)




