मुलांनी अपमानास्पद वागणूक दिल्याने 4 कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
रागाच्या भरात सेवानिवृत्त लष्करी जवानाने घेतला निर्णय

वृत्तसंस्था – आयुष्यभर स्वाभिमानाने जगलेल्या वडिलांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे दुखावलेल्या वडिलांनी थेट आपल्या नावे असलेली सुमारे चार कोटी रुपयांची संपत्ती मंदिराला दान केली. वेळोवेळी मुलीकडून मिळणाऱया अपमानास्पद वागणुकीमुळे दुखावलेल्या वडिलांच्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मंदिराला सुमारे चार कोटींची संपत्ती दान करणारे वडील लष्करातून निवृत्त झालेले असून एस. विजयन असे त्यांचे नाव आहे.

तमिळनाडू राज्यातील तिरुवन्नामलाई जिल्ह्यातील अराणी शहराजवळ असणाऱ्या केशवपुरम या गावातील रहिवासी असलेल्या एस. विजयन यांनी मुलीकडून वारसा हक्कावरून वेळोवेळी होणा-या अपमानास्पद वागणुकीमुळे तमिळनाडूतील अरुलमिगु रेनुगांबल अस्मान या मंदिराला हीी चार कोटी रुपयांची संपत्ती दान केली आहे. वारसाहक्कावरून वर्षानुवर्षे आपल्या मुलीने आपल्याकडे दुर्लक्ष करतानाच वेळोवेळी दुखावले असल्याचा वडिलांनी आरोप केला आहे. यामुळेच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
निवृत्त लष्करी जवान एस. विजयन यांनी मंदिराला दिलेली संपत्ती परत मिळण्यासाठी जवानाच्या कुटुंबियांकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. संपूर्ण जगात ज्येष्ठ नागरिक ही समस्या बनू पाहत असतानाच आयुष्यभर स्वाभिमानाने जगलेल्या ज्येष्ठांच्या वाट्याला येणाऱया अशा प्रकारच्या दुखावणाऱया प्रसंगांमुळे अनेक जण नैराश्याच्या गर्तेत अडकल्याचे प्रमाण वाढते आहे. अशा वेळी आयुष्यभर ज्या आईवडिलांनी आपल्यासाठी कष्ट केले, त्यांच्या वाट्याला आयुष्याच्या उतारवयात येणारे असे प्रसंग ज्येष्ठांना दुुखावणारे असतात.

अरुलमिगु रेनुगांबल अस्मान या मंदिराच्या प्रशासनातर्फे दर दोन महिन्यांनी मंदिराची दानपेटी उघडून दानपेटीत नागरिकांनी टाकलेल्या संपत्तीची मोजमी केली जाते. येथील मंदिरात अकरा दानपेट्या असून मोजणीच्या दिवशी एका मंदिरात पैशांसोबतच सेवानिवृत्त लष्करी जवानाने दान केलेल्या संपत्तीची कागदपत्रे सापडली. या कागदपत्रांसोबतच दानपेटीत एक चिठ्ठीही मंदिर प्रश्सनाला मिळून आली. त्यात माझ्या नावे असलेली संपत्ती मी स्वेच्छेने मंदिराला दान करत असल्याचा उल्लेख चिठ्ठीत केला होता. कुटुंबाकडून होणाऱया अपमानास्पद वागणुकीमुळे निवृत्त लष्करी जवानाला घ्यावा लागलेल्या कटू निर्णयामुळे समाजमन हेलावून निघालंय.




