नाशिकमध्ये रिक्षा चालवायचीय… मग मराठी लिहिता, वाचता येणं बंधनकारक…
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नव्या नियमामुळे दीडशेवर अर्ज बाद

नाशिक (वार्ताहर) – नाशिक शहरातील ज्या रिक्षाचालकांना मराठी लिहिता, वाचता येत नाही, अशा रिक्षाचालकांना रिक्षापरवाना देणे बंद केल्याने रिक्षाचालकांचे धाबे दणाणले आहे. नव्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असले तरी रिक्षाचालकांनी याबाबत नाराजीचा सूर दाखवला आहे. नव्या निर्णयामुळे आतापर्यंत तब्बल दीडशेवर रिक्षाचालकांचे अर्ज बाद ठरले आहेत.
अनेक रिक्षाचालक बोलणारी मराठी उत्तम जाणतात, मात्र शाळेतील शिक्षण अपूर्ण असल्याने त्यांना लिहिणं किंवा वाचणं अवघड जातं. परिणामी ते या चाचणीत नापास होतात आणि परवान्यापासून वंचित राहतात. या निर्णयावर रिक्षा चालक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाशिक येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रिक्षा परवाना देताना रिक्षाचालकाला मराठी लिहिता तसेच वाचता येणं सक्तीचे केले आहे. आरटीओने रिक्षा परवाना मिळवण्यासाठी आता नवीन अट लागू केली असून, मराठी भाषेची मूलभूत परीक्षा पास होणं अनिवार्य केलं आहे. याचा फटका अनेक रिक्षाचालकांना बसू लागला असून, गेल्या आठवड्यात तब्बल 145 अर्जदार रिक्षाचालक अपात्र ठरले आहेत.

नाशिक शहरात रिक्षा चालवण्यासाठी फक्त वाहनचालक परवाना असून चालणार नाही, तर संबंधित रिक्षाचालकाला मराठी भाषा लिहिता-वाचता येणंही बंधनकारक असणार आहे. नाशिक येथील आरटीओतर्फे करण्यात आलेल्या या नव्या नियमामुळे मराठी लिहिता व वाचता न येणारे रिक्षाचालक अडचणीत आले आहेत. रिक्षाचालक संघटनांनी प्रशासनाकडे पुनर्विचाराची मागणी केली आहे. मराठीचा सन्मान राखत, व्यावहारिक अडचणी लक्षात घेऊन काही सवलती देण्यात याव्यात, अशी त्यांची मागणी आहे. विशेष प्रशिक्षणाद्वारे वाचन-लेखन शिकवणं आणि त्यानंतर परीक्षा घेणं, हाही पर्याय चर्चेत आहे. एकूणच, या नव्या अटीमुळे नाशिकमध्ये रिक्षा परवान्यासाठी एक वेगळा विषय चर्चेसाठी समाजमाध्यमांसमोर आला आहे.




