
माझी आई…
आई या शब्दात सर्व जग सामावले आहे. लहानपणापासून आपण आईच्या कुशीत जास्त वेळ घालवत असतो आणि आपल्याला ते सुरक्षित वाटत असते. आपण जन्म घेतल्यापासून आपल्याला आईचा स्पर्श जाणवत असतो, आईच्या स्पर्शात ताकत असते, ऊब असते, बळ असते, आईच्या मायेचा हात आपल्या डोक्यावरुन फिरला तरी आपण सर्वात सुखी, सुरक्षित आणि भाग्यशाली आहोत, असे आपल्याला जाणवते.

आपले मूल म्हातारे झाले तरी आईला लहानच वाटत असते. आई मुलांसाठी स्वत: कडे कधीच लक्ष देत नाही. सर्वात आधी आपल्या मुलांना प्राधान्य देते. आईच्या हृदयातच असते. माझी मुल सुखी आणि आनंदी कशी रहावी यासाठी कायम तिची धडपड सुरू असते.

मुलांना काय आवडत, मुलांच्या मनात काय चालले आहे हे सतत आईला जाणवत असते, मग ते मूल कोसो मैलावर दूर असले तरी, मुलाला ठेच लागली तरी आईच्या काळजाला दुखापत होते, म्हणूनच तिन्ही जगाचा स्वामी आईविना भिकारी ही म्हण प्रचलित झाली आहे. आई खूप महान आहे तिच्यापुढे सर्व काही लहान आहे. आई आपल्याला सतत कळत नकळत चांगल्या गोष्टी, चांगले धडे गिरवीत असते. प्रत्येक आईला वाटते माझे मूल जगामध्ये सूर्यासारखे चमकावे , चंद्रासारखे शीतल असावे. आईचे जग आपल्या बाळामध्ये सामावलेले असते.
स्त्रीला जेव्हा कळते की ती आई होणार आहे, त्या क्षणापासून तिच्यात मोठा बदल झालेला असतो. तेव्हापासूनच ती आई झालेली असते. आई म्हातारी झाली तरीही मूल तिच्यासाठी लहानच असते. मुलांची काळजी करत असते. आकाशाएवढा कागद समुद्राएवढी शाई पण आई या शब्दावर लिहायचे म्हटले तरीही अपूर्णच. आई महान आहे. आईचे हृदय समुद्रासारखे आहे.
मी तर म्हणते हे देवा कोणाजवळ काही नसले तरी चालेल पण आई नावाचा देव प्रत्येक व्यक्तीला दे. आपल्या घरात आई हसत असेल तर कोणत्याच देवाची पुजा करण्याची गरज भासत नाही. आई साक्षात देवाच रूप म्हणजे आईच आहे. ज्या घरात आई आनंदी असते त्या घरात सदैव देवाची कृपा असते ते घर धन धान्य आणि समृद्धीने भरलेले असते. आईला साष्टांग नमस्कार.
(लेखिका सुदर्शना पाटील या सामाजिक कार्यकर्त्या असून सामाजिक कार्यात नेहमीच त्यांचे योगदान असते.)
आपणही आपल्या आईच्या आठवणी 7720030574 या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवू शकता… सोबत आपल्या आईसमवेत आठवणी असलेले दोन तीन फोटोही पाठवा. नक्कीच “विकासाची वाट न्यूज”मध्ये प्रसिद्धी दिली जाईल.




