महाराष्ट्र

अंतापूर येथील दावल मलिक देवस्थान रस्त्याला मुहूर्त कधी लागणार?

भाविकांची अडचण लक्षात घेऊन रस्त्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी

नाशिक (वार्ताहर) : मोसम खोऱ्यातील हिंदू मुस्लिम लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दावल मलिक बाबा देवस्थानचा डोंगर उतारावरील पायवाटेसारख्या रस्त्यामुळे दर्शनासाठी जाताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दावल मलिक देवस्थानास पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याबरोबरच संबंधित विभागाने लक्ष घालून रस्त्याची निर्मिती करावी अशी मागणी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते जयेश घुगे यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.


दरम्यान याबाबत सामाजिक कार्यकर्त्याकडून थेट मंत्रालयापर्यंत – पाठपुरावा करण्यात आला असला तरी वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पर्यटन विभाग एकमेकाकडे जबाबदारी ढकलत असल्याने या प्रश्नावर कधी तोडगा निघेल, अशी अपेक्षा भाविक व्यक्त करू लागले आहेत. बागलाण तालुक्यातील अंतापूर येथील डोंगरावर दावल मलिक बाबांचा दर्गा आहे. राज्यभरातून हजारो भाविक दर गुरुवारी अंतापूर येथे दर्शनासाठी येतात. नवसपूर्तीसाठी राज्यभरातील शेकडो पायी पालख्यादेखील वर्षभर येत असतात.

हिंदू-मुस्लीम भाविकांचे आराध्य श्रद्धास्थान असूनही डोंगरावर जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते जयेश घुगे यांनी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत.

मुहूर्त कधी लागणार?

देवस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध नाही. खाली येताना नागरिकांना जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे प्रशासनाने याकामी लक्ष घालून डोंगरावर जाण्यासाठी रस्त्याची व येणाऱ्या मार्गाची योग्य पाहाणी करून दावल मलिक दर्त्यांस पर्यटनस्थळ दर्जा देण्यात येवून तातडीने रस्त्याची निर्मिती करावी, अशी मागणी घुगे यांनी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

श्रीक्षेत्र दावल मलिक बाबा देवस्थानचा परिसर वन विभागाच्या अखत्यारीत असल्याने विकासकामांपुढे अडचणीचा डोंगर उभा असल्याचे स्थानिक प्रशासनाचे म्हणणं आहे. स्थानिक खासदार, आमदार यांनी याकामी लक्ष घालून भाविकांच्या जनमताचा आदर करून तातडीने रस्त्याचे काम मार्गी लावावे, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.

भाविकांची अडचण लक्षात घ्या

रस्त्याची गरज लक्षात घेऊन आपण संबंधित विभागांशी पत्रव्यवहार केला, मात्र अजूनही या प्रश्नावर तोडगा निघू शकला नाही. राज्यभरातून येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन देवस्थानापर्यंत जाणारा रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा.

:: जयेश घुगे, सामाजिक कार्यकर्ते, पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!