सामाजिक

वाचावी गीता गोड फुलते जीवन…

सावळीराम तिदमे, साहित्यिक, ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, नाशिक

॥अंतरयात्रा॥

(क्रमशः )

तुम्ही पुस्तकं वाचता काय ? वाचत नसाल तर वाचायला सुरूवात करा . वाचायला आवडत नाही , मन लागत नाही , कंटाळा येतो , झोप येते . अशा असंख्य सबबी प्रत्येकाजवळ आहेत .आपल्या देहमंदिरातील मन नावाचा घटक केंद्रस्थानी आहे . चला पुस्तक वाचू या ,असा विचार तिथं उगवला की मन तत्परतेने म्हणते आता नको नंतर . हा मनाचा स्वभाव आहे . म्हणून तर मनाची जडण घडण , मशागत दररोज करावी लागते . मन या दोन अक्षरांनी देह मंदिर आणि विश्वमंदिर व्यापलेले आहे . मनाची जात कोणती , धर्म कोणता , देश कोणता , पक्ष कोणता , स्वभाव कसा , आकार कसा ?हे सर्व जाणण्यासाठी तुम्हाला पुस्तकच वाचावे लागेल . पुस्तक आणि मस्तक , अक्षरे , मन , मेंदू , बुध्दी या सगळ्यात समन्वय , सुसंवाद घडविण्याचे काम पुस्तके करतात .

पुस्तके वाचनाचे प्रमाण कमी झाले . म्हणून मानवी जीवन रुक्ष व विकृत बनले . पुस्तकांमध्ये , अक्षरधनामध्ये देह मंदिरात व विश्वमंदिरात क्रांतिकारी परिवर्तन करण्याचे सामर्थ्य दडलेले आहे . पुस्तक वाचण्याच्या संस्कारामुळे वाचनाची क्षमता , सूक्ष्मता , गुणवत्ता व सर्वसमावेशकता वाढत जाते . पुस्तके माणसाला सर्वांगाने श्रीमंत , सौंदर्यशाली , गुणवंत , कलावंत , सामर्थ्यवंत , ज्ञानवंत , शौर्यशाली ,बहुआयामी ,नामवंत,अद्वितय व अफलातून घडवतात . पुस्तकामध्ये अनंत उर्जास्रोत , प्रेरणास्रोत लपलेले असतात . अक्षरांच्या पलीकडचं वाचण्याची दृष्टी पुस्तके देतात . पुस्तके नव्हती तेंव्हा सुध्दा माणसाचे वाचन सुरू होते .पृथ्वी , आप , तेज , वायू व आकाश ही पंचमहाभूते हे वाचनाचे विषय होते . देह मंदिरात सृष्टीनिर्मात्याने जी दालने निर्माण केलेली आहेत ती जरा डोळे भरुन पहा .

वाचन , मनन , स्मरण , चिंतन , मंथन , लेखन , श्रवण अशी खूप दालने देह मंदिरात आहेत . देहमंदिररूपी भ्रमणध्वनी , संगणकात अनंत दालने , क्षमता , गुणवत्ता व कला कौशल्ये सुप्त स्वरुपात आहेत . आपण त्यांचा शोध घेत नाही , उपयोग करीत नाही . त्यासाठी पहावे आपणाशी आपण ,वाचावे आपणाशी आपण .आपलं देहमंदिर , आपला जीवनग्रंथ आपण वाचतो का ? आपली वाचनक्षमता , वाचनकौशल्य यांना डोळे भरून पहा . ईश्वरदत्त आयुष्य , देहमंदिर व जीवनउर्जेत वाचन नावाचे दालन आहे हेच माणूस विसरला. ईश्वराने दिलं पण माणसाने हरवलं . खरोखर असं घडलं . मला रात्री एक स्वप्न पडलं .

भारतातल्या सर्व वाचनालयांमध्ये माणसं रांगा लावून उभी आहेत वाचनाची तहानभूक शमविण्यासाठी . माणसात जशी अन्नाची भूक आहे , पाण्याची तहान आहे . तशी प्रत्येक देह मंदिरात वाचनाची तहानभूक आहे . सर्वात्मक ईश्वराने त्यासाठीच मेंदू , मन , बुध्दी , ज्ञानेंद्रिये , प्रतिभा व प्रज्ञा अशी योजना करून ठेवली आहे . आपण स्वतःला वाचत नाही , समजून घेत नाही , जाणण्याचा प्रयत्न करीत नाही . वाचनालयांमधील अनंत विद्याशाखा , ग्रंथसंपदा माणूस अवाचक झाल्यामुळे रडते आहे . हे स्वप्नातून जागे झाल्यावर माझ्या लक्षात आले .

माणसातली ज्ञानपिपासा माणसाला पुस्तकांशी , वाचनालयांशी नक्की जोडेल व त्यातूनच विश्वमंदिर सर्वांगसुंदर होईल अशी माझी दृढ श्रध्दा आहे . मनामनात , घराघरात , प्रत्येक कुटुंबात वाचन प्रेरणा , उर्जा व प्रकाश पोहचावा असं काम विश्वमंदिरात सुरू झालेलं आहे , हे तुम्हाला माहीत आहे का ? विविध ज्ञान विज्ञान व तत्त्वज्ञानाने ओथंबलेले ग्रंथ आपणास साद घालीत आहेत . सद्ग्रंथांचं वाचन अंतरंग शुद्ध , पवित्र व सामर्थ्यसंपन्न करतं .
वाचावी गीता गोड फुलते जीवन.

जीवन सुगंधीत होऊन उमलावं…

यासाठी गीता आचरणात पाझरली पाहिजे.

संपर्क : ८००७९७५७६०.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!