नातवाने आजीला कचराकुंडीत फेकले… इथे माणुसकी ओशाळली…
माणुसकीशून्य नातवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबई : आयुष्यातील जगण्याची वाट कधीकधी समोर काय वाढून ठेवेल? हे कोणीही सांगू शकत नाही. मात्र आपल्या अवतीभवती घडणाऱ्या काही घटनांमुळे माणुसकी शिल्लक राहिली नाही, असेही वाटायला लागते. माणुसकीला काळिमा फासणारी गंभीर घटना मुंबईत घडल्याचे समोर आले आहे.
आयुष्यात ज्या आजीने संस्कारांचा वसा जपून ठेवला त्या आजीलाच नातवाने आरे वसाहत भागातील कचराकुंडीत फेकून दिल्याची मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. त्वचेचा कॅन्सर झालेल्या सख्ख्या आजीला तिच्या नातवाने फेकून दिलेल्या वृद्ध आजीचे नाव आहे यशोदा गायकवाड…

कचऱ्यात फेकून दिलेल्या आजीच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून तिच्यावर कुपूर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. वृद्ध आजी यशोदा गायकवाड आणि तिचा नातू मुंबईच्या कांदिवली परिसरात वास्तव्यास होते. आजीला बोलता येत नव्हते, फक्त नातू, नातू असे त्या पोलिसांना सांगत होत्या.

आरे परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक तपास करत आरे पोलीस वृद्ध आजीचा कुटुंबीयांचा शोध घेत मिळालेल्या माहितीनुसार तिच्या नातवाला बेड्या ठोकल्या. मुंबईतील आरे कॉलनीतील कचराकुंडीत ६० वर्षीय आजी जखमी अवस्थेत पडलेल्या होत्या. कचराकुंडीत पडलेल्या आजी कांदिवली भागातील रहिवासी असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. सीसीटीव्ही फुटेज आणि तपासादरम्यान पोलिसांना कळले की, सकाळी आजीच्या नातवाने महिलेला रिक्षातून आरे कॉलनीच्या जंगलात आणले होते आणि कचराकुंडीत टाकले होते.

मुंबईतील आरे परिसरात कचराकुंडीत कॅन्सर झालेल्या यशोदा आजीला फेकणाऱ्या संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या प्रकरणात पोलिसांनी आजीचा नातू, मेहुणा आणि रिक्षाचालकाला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे राहुल शेवाळे (नातू), बाबासाहेब गायकवाड आणि संजय कद्रेशिम अशी आहेत.
त्वचेच्या कॅन्सरने पीडित आजीला रुग्णालयात दाखल करण्याऐवजी नातवाने तिला जिवंत कचराकुंडीत फेकून दिले. मन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असून आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकणाऱ्या नातवाला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.




