अर्धनग्न पूजा अन् पैशाचा पाऊस…
ढोंगी बाबावर गुन्हा दाखल…
अज्ञानाचा फायदा घेत, आजारपण बरे करण्याचे आमिष दाखवून आणि पैशाचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने एका महिलेची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकमधील एका भोंदूबाबाविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला असून, या कारवाईमुळे अंधश्रद्धा पसरवणाऱ्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमकी घटना?
प्राप्त माहितीनुसार, पनवेल येथे राहणाऱ्या एका महिलेला बऱ्याच काळापासून अस्थमाचा (दम्याचा) त्रास होत होता. यादरम्यान, तिला नाशिक येथील गंगापूर शिवारात राहणारा अरुण धोंडू पाटील या भोंदूबाबाच्या कथित ‘दैवी शक्ती’बद्दल व चमत्कारांबद्दल माहिती मिळाली. या भोंदूने पीडित महिला आणि तिच्या पतीचा विश्वास संपादन करण्यासाठी थेट पनवेलला स्वतःची गाडी पाठवली. यानंतर दोघा पती-पत्नीच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधून त्यांना अत्यंत गूढ आणि संशयास्पद हालचालींमध्ये नाशिक येथे आणले गेले. नाशिकमध्ये आणून त्यांच्यावर अघोरी पूजा करण्यात आली आणि पुन्हा डोळ्यावर पट्टी बांधून त्यांना पनवेलला सोडण्यात आले. दुसऱ्यांदाही असाच प्रकार घडवण्यात आला. या दिखाव्यामुळे महिलेला आपल्या आजारपणाचा गुण आल्याचा आभास निर्माण झाला आणि या भोंदूवर त्यांचा अंधविश्वास बसला.
अघोरी पूजा आणि साडेसात लाखांचा गंडा
विश्वास बसल्यानंतर या भोंदूबाबाने आपली पाळेमुळे अधिक घट्ट करत पीडितेला ‘पैशाचा पाऊस पाडून देतो,’ असे लालच दाखवले. यासाठी त्याने पीडितेला तिच्या मासिक पाळीच्या काळातील रक्ताने माखलेले कपडे सोबत आणण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे, पनवेलहून पुन्हा त्यांच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधून त्यांना नाशिकमधील गंगापूर रोडवरील बालाजी मंदिराजवळ आणले गेले.
तिथे एका निर्जन किंवा गुप्त ठिकाणी अतिशय भयंकर आणि अघोरी पूजा मांडण्यात आली. पूजेच्या नावाखाली पीडितेला तिच्या अंगावरील कपडे काढण्यास सांगून एक पांढरे, पारदर्शक व पातळ वस्त्र नेसवण्यात आले. त्यानंतर तिच्या अंगावर पाणी ओतण्यात आले. मासिक पाळीच्या रक्ताने माखलेल्या कपड्यांची पूजा मांडण्यात आली. मानवी कवटी, तांदूळ, हळद, कुंकू, गुलालाचे पाणी आणि बुक्का यांसारख्या साहित्याचा वापर करून सुमारे दोन तास चाललेली ही अघोरी पूजा भोंदूबाबाने मंत्रोच्चार करत पार पाडली. अंधश्रद्धेची परिसीमा गाठत या पूजेदरम्यान एका बोकडाचा बळीही देण्यात आला. “घरी परत गेल्यावर पैशाचा पाऊस पडेल,” असे सांगत पुन्हा त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्यांना पनवेलला पोहोच करण्यात आले. या तिन्ही पूजाविधींच्या नावाखाली भोंदूने त्यांच्याकडून वेगवेगळ्या टप्प्यांवर तब्बल साडेसात लाख रुपये उकळले.
