एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने अजमेर सौंदाणे शोकसागरात
राजस्थानात मगर परिवाराच्या वाहनाला अपघात, 25 जखमी,6 गंभीर



(सतीश कापडणीस यांजकडून)
नामपूर : जयपूर- अजमेर रस्त्यावर अजमीर सौदाणे येथील भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. तीन जणांचा मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. बागलाण तालुक्यातील अजमेर सौंदाणे येथील मगर परिवारातील लहान मोठे असे २५ सदस्य हे राजस्थान दर्शनासाठी गेले असता जयपूर पासून चाळीस किलोमीटर अंतरावर झालेल्या भीषण अपघातात एकाच परिवारातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर पाच ते सहा जण गंभीरित्या जखमी असून काही जण किरकोळ जखमी असल्याचे प्राथमिक माहितीनुसार कळाले आहे.



याबाबत सविस्तर वृत्त असे की बागलाण तालुक्यातील अजमेर सौंदाणे येथील मगर परिवारातील २५ सदस्य हे राजस्थान दर्शन तसेच खाटू श्याम येथे दर्शनासाठी गेले असता परतीच्या प्रवासात जयपुर पासून ४० किलोमीटर अंतरावर यांच्या वाहनाचा दुर्दैवी अपघात झाला असता यात तीन जण जागीच ठार झाले आहेत या घटनेची माहिती अजमीर सौंदाणे गावात कळाली असता अजमीर सौंदाणे गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

अपघात इतका गंभीर होता की वाहनाचा अक्षरशा चुराडा झालेला आहे
या अपघातात महेश विजयसिंग मगर,दीपक त्रंबक मगर व संदीप रामसिंग मगर यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर पाच ते सहा जण गंभीररित्या जखमी झालेले आहेत जखमींमध्ये काही लहान बालकांचा देखील समावेश असल्याचे कळते आहे.





