हरीनामाचा महिमा उलगडणारे नंदकुमार मोरे यांचे व्याख्यान
गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघ व भावसार क्षत्रिय समाज यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानमाला

गोविंदनगर (वार्ताहर) : संत वाड्मयाचे अभ्यासक नंदकुमार मोरे यांनी गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघ व भावसार क्षत्रिय समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ९व्या व्याख्यानमालेत ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठावर व्याख्यानातून हरीनामाच्या महत्त्वाचा पट उलगडला. त्यांचे सुस्पष्ट आणि ओघवते भाषण उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून गेले.
व्याख्यानाची सुरुवात त्यांनी संत ज्ञानेश्वर यांच्या हरीपाठातील पहिल्या अभंगाने केली —
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा।पुंण्याची गणना कोण् करी ॥२॥ या ओळींच्या माध्यमातून त्यांनी हरीनाम म्हणजे ईश्वराशी जोडणारा सहज व सोपा मार्ग आहे, हे अधोरेखित केले.
आजच्या धकाधकीच्या जीवनात मनःशांती हरवलेली असताना, ‘हरीनाम’ हेच एक प्रभावी साधन आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
श्री मोरे यांनी अनेक संतांच्या उदाहरणांचा संदर्भ देत, हरीनामामुळे आयुष्यात घडलेले सकारात्मक बदल श्रोत्यांसमोर ठेवले. “हरिनाम हा फक्त जपाचा विषय नसून, तो आचरणाचा मार्ग आहे,” असे सांगत त्यांनी हरीनामाचे व्यावहारिक उपयोगदेखील उलगडले.
अध्यक्षस्थानी गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व साहित्यिक ओमप्रकाश शर्मा तर प्रमुख पाहुणे म्हणून अशोक बोरस्ते होते. व्याख्यानास परिसरातील नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशोक देवरे यांनी ९ व्या वसंत व्याख्यानमालेच्या या सांगता करणाऱ्या व्याख्यानानंतर प्रमुख पाहुणे, व्याख्याते, भावसार क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष संजय प्रयागे व इतर पदाधिकारी तसेच गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यकारिणी मंडळाच्या सर्व सदस्य तसेच बाळासाहेब देशमुख व अनंत दशपुत्रे यांच्या विशेष सहकार्याबद्दल आभार मानले. भावसार क्षत्रिय समाजातर्फे दिलेल्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.





