वृद्धापकाळ आहे सामाजिक कार्याची संधी
आयुष्य हातातून निसटून जायच्या आधी जगून घेवूयात...


जगण्याच्या वाटचालीत अनेकांना आयुष्य हातातून निघून चाललंय… हे कळतच नाही. मात्र जेव्हा कळते तेव्हा हातातून सर्व सुटलेलं असतं… प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जन्माला आल्यानंतर आपण वयाने वाढतो आणि एक दिवस मरून जातो. पण आपल्या अवती भवती असेही लोक आहेत, जे जन्माला आल्यानंतर आयुष्य न जगताच मरून जातात. जन्माला आल्यानंतर प्रत्येकाचा मृत्यूपर्यंतचा प्रवास हा ठरलेलाच असतो. फक्त त्यात कोणी आधी तर कोणी नंतर असा विधीलिखित प्रवास असतो. मात्र अनेक जण भूतकाळाचा किंवा भविष्याचा विचार करत जगत असतात. मात्र हा विचार करताना अशा व्यक्तींना हे कळत नाही की, आपला वर्तमानकाळ आपण हरवतोय.
एकदाच मिळालेला जन्म आनंदी घालवण्यासाठी वर्तमानकाळाचा विचार करूनच आयुष्याचा आनंद घेता आला पाहिजे. प्रत्येक जण आयुष्याला पुढे नेत असताना नोकरी, व्यवसायातील योगदान दिल्यानंतर मावळतीकडे झुकलेलं आयुष्य आनंदाने जगण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. कारण भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींमध्ये आपण कोणताही बदल घडवून आणू शकत नाही आणि भविष्यात होणाऱ्या घटनांची आपल्याला माहिती नसते. मात्र येणा-या काळात वृद्धापकाळ आनंदी करायचा असेल तर स्वतःवर काही बंधने घालून घ्या. रोजचा दिवस आनंदी कसा घालवता येईल… याचा प्राधान्याने विचार करावा. पद, पैसा, प्रतिष्ठा, अधिकार हे सर्व बाजूला ठेवून केवळ माणूस म्हणून जगा. शक्य झाले तर सामाजिक दायित्व जपत एखाद्या संस्थेसाठी खारीचा वाटा उचलत आपल्या परीने काही मदत करता आली तर नक्कीच विचार करा. कारण हेच समाधान वृद्धापकाळात जगण्यासाठी मोठा आधार देवून जाते आहे. खास वृद्धांच्या गरजांचा विचार करून सुरू झालेले प्रकल्प वृद्धांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत अतिशय कमी आहेत. अनेक जण आर्थिक स्त्रोत म्हणून वेगवेगळे प्रकल्प उभे करतात, मात्र खास वृद्धांच्या गरजांचा विचार करून प्रकल्प उभे करणारे तुलनेने अतिशय कमी आहेत.

वृद्धापकाळात स्वतःचा बँक बॅलन्स कितीही असू द्या, तो तुमच्या उपयोगात येणार नाही. कारण हे सर्व तुमच्या हातातून निसटून जाणारे असते. तुमचे वय वाढत गेले की, तुमच्याकडून अनेक जबाबदा-या नकळतपणे काढून घेतल्या जातात. अशा वेळी आपणही यातून बाजूला होवून संभाव्य वादांना दूर ठेवणे महत्त्वाचे असते. आपले आयुष्य अधिकाधिक आनंदी कसे ठेवता येईल, याकडे प्राधान्याने लक्ष द्या. याच सर्व गोष्टींचा विचार करून अनेक ठिकाणी वृद्धांना आधार देणारे उपक्रम सुरू झालेत. जसे की नाशिकमध्ये जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लबची स्थापना झाली. आनंदी आयुष्य कसे जगावे… याचा जणू या ठिकाणी सारीपाठच घालवून दिलाय. पैसा कमावणे हा उद्देश न ठेवता वृद्धांच्या आयुष्यात आनंद पेरण्यासाठी नाममात्र शुल्क घेवून हा प्रकल्प चालवला जातोय. याशिवाय ज्यांना शांत आणि धकाधकीच्या गोंगाटापासून अलिप्त राहायचे असेल त्यांच्यासाठी याच ठिकाणी शिवसुमन वृद्धाश्रमात राहण्याची व्यवस्था करण्यात आलीय.
आपल्या आयुष्यात अनेक आशा-अपेक्षा बाळगत असतो आणि त्या अशा पूर्ण झाल्यानंतरही पुन्हा नवीन आशा अपेक्षा बाळगायला सुरुवात करतो. मात्र कुठेतरी पण या सर्वांना पायबंद घातला पाहिजे. कारण माणसाला आयुष्यातील शेवटच्या क्षणापर्यंत हाव कधीही सुटत नाही. मावळतीकडे झुकलेलं आयुष्य आनंदी करायचे असेल तर नक्कीच येणाऱया काळात वृद्धाश्रमे ही काळाची गरज बनणार आही. कुटुंबाचा वाढणारा विस्तार, वृद्धांशी बोलण्यासाठी घरात सदस्यांचा अभाव, आरोग्याच्या कुरबुरी, घरातील वाढता खर्च, पती पत्नीला नोकरी करण्याशिवाय पर्याय नाही आदींसह अन्यही वाढत्या समस्या लक्षात घेवून आपल्या वयातील लोकांमध्ये मिसळून राहणे ही भविष्यातील महत्त्वाची बाजू प्रत्येकाला भक्कम करावी लागणार आहे किंबहुना नाशिकमध्ये उभ्या राहिलेल्या जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमाच्या प्रकल्पांमध्ये स्वतःला सहभागी करून घेत आयुष्य आनंदी करणे, हे महत्त्वाचे असणार आहे.






