करिअरविशेषशहरशैक्षणिकसामाजिकसांस्कृतिक

ग्रंथालय व माहितीशास्त्र अभ्यासक्रम कार्यशाळा संपन्न

श्रीमती नर्मदाबाई नागो चौधरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कुसुंबा येथे आयोजन

नितीन इंगळे (विकासाची वाट न्यूज प्रतिनिधी, धुळे)

धुळे : श्रीमती नर्मदाबाई नागो चौधरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कुसुंबा येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व महाराष्ट्र युनिव्हर्सिटी व कॉलेज लायब्ररीयन्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथालय व माहितीशास्त्र अभ्यासक्रम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार कला वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांसाठी ग्रंथालय व माहितीशास्त्र हा विषय अध्यापनासाठी सुरू असल्यामुळे त्याचा अभ्यासक्रम अध्यापन व परीक्षा मूल्यमापन या विषयावर विद्यापीठाने कार्यशाळा घेण्यासाठी मान्यता दिली होती.
कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक भारतीय ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष डॉ. मोहन खेरडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. शिवाजी पाटील यांच्या शुभ हस्ते झाले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष व ग्रंथालय माहितीशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल महादू चौधरी हे होते. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन बारी, अधीसभा व विद्यापरिषद सदस्या प्रा. डॉ. दीपिका चौधरी, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. ऋषिकेश चित्तम, मुकला संघटनेचे सचिव डॉ. विनय पाटील, ज्ञान स्त्रोत केंद्राचे प्रभारी संचालक प्रा. विजय आहेर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल बाविस्कर, संस्थेचे संचालक व उपप्राचार्य डॉ. मधुकर कासार, डॉ. तुषार पाटील, डॉ. विजय जाधव हे उपस्थित होते. डॉ. शिवाजी पाटील यांनी आपल्या मनोगतात ग्रंथपाल हा महाविद्यालयाचा आत्मा आहे आणि आत्मा एका ठिकाणी शांत बसून चालत नाही. ग्रंथपालांना अध्यापनात सहभागी करून घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये भर पडेल व आपल्या विद्यापीठातील पदवी स्तरावर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे संशोधन करण्यासाठी माहिती साधने ज्ञान साधने यांची जाण होईल व भविष्यातील संशोधनासाठी त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना होणार असे प्रतिपादन त्यांनी केले.
प्रमुख मार्गदर्शक डॉ. मोहन खेरडे यांनी महाविद्यालयीन अभ्यासक्रमांमध्ये व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्य आधारित शिक्षण पद्धतीवर भर दिला गेला आहे आणि या कौशल्याच्या आधारित शिक्षण पद्धतीत ग्रंथालय कौशल्य विद्यार्थ्यांसाठी अध्यापन करणे, हे सर्व ग्रंथ बांधवांसाठी उत्कृष्ट संधी आहे. उद्याच्या राष्ट्र उभारणीत व देशाच्या संशोधनात याचा मोलाचा वाटा असेल असे प्रतिपादन केले.

अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. अनिल चौधरी यांनी नवीनच सुरू झालेल्या ग्रंथालय व माहितीशास्त्र हा विषय कसा महत्त्वपूर्ण आहे हे मुद्देसूद पटवून दिले. हा अभ्यासक्रम लागू करण्यासाठी कसे प्रयत्न करण्यात आले याबद्दल मार्गदर्शन केले आणि कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन डॉ. हाशिम शेख व डॉ. योगेश पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. जी. ओ. चौधरी आणि प्रा. दाऊतखाणे यांनी केले. कार्यशाळेस विद्यापीठ परिक्षेत्रातील 100 पेक्षा जास्त ग्रंथपाल, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!