दिवाळीचा आनंद जवानांना भेटवस्तू पाठवून साजरा
प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंडचा सामाजिक उपक्रम



नाशिक (प्रतिनिधी) : दिवाळीच्या निमित्ताने नागरिकांनी पंजाब सीमेवरील भारतीय सैनिकांसाठी दिवाळीच्या खास भेटवस्तू पाठवून कृतज्ञता व्यक्त केली. लष्करी जवानांसमवेत दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंड मार्फत सन २००३ पासून नियमितपणे राबविला जात आहे. या उपक्रमात अंध व्यक्तींचाही उत्साहाने सहभाग असतो.
लक्ष्मीपूजनच्या दिवशी नाशिक रोड रेल्वेस्थानक परिसरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात जवानांसाठी तयार करण्यात आलेल्या वस्तू प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंडचे सचिव सतीश नवले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. यात जयस्तुते फाउंडेशनचे अध्यक्ष मोहन गायधनी यांनी संस्थेमार्फत वीर जवानांसाठी मिठाई/पदार्थांचे पाकीट व मेणबत्ती भेट दिल्या. माजी नगरसेवक शिवाजी गांगुर्डे यांनी दिवाळीनिमित्त जवानांसाठी उटणे व ग्रीटिंग्ज (शुभेच्छा पत्रे) तसेच इतर आवश्यक वस्तूंचे योगदान दिले. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी लष्करी जवानांसाठी खास शुभेच्छा पत्रे तयार करून दिली.


सर्व साहित्य घेऊन पंजाब मेल रेल्वेने पंजाब बॉर्डरवर सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्याकरता जात आहेत. सतीश नवले, संतोष परीट, रफिक कच्छी, मोनिका पाटील, रोहिणी नागरे, मयुरी वाघमारे, अक्षता बिराजदार, प्रणाली देसाई व उत्तम मोरे आदी सदस्य रवाना झाले. भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक तथा सुभेदार उल्हास कुलकर्णी, अजित कुलकर्णी, ॲड. समीर जोशी व सदाशिव पंचारिया यांच्यासह निवृत्त नायब सुभेदार तसेच अनेक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित कुलकर्णी यांनी केले व उल्हास कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सदाशिव पंचारिया यांनी आभार मानले.




