केटीएचएम महाविद्यालयात गांधी-शास्त्री जयंती उत्साहात साजरी
मान्यवरांची उपस्थिती : विविध उपक्रमांचे आयोजन



नाशिक, दि. 2 ऑक्टोबर: येथील मविप्र संचलित केटीएचएम महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्यावतीने शुक्रवार, दि. 2 ऑक्टोबर 2026 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कल्पना आहिरे यांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी उपस्थित सर्वांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना अभिवादन केले.

आपले मनोगत व्यक्त करताना प्राचार्या डॉ. कल्पना आहिरे म्हणाल्या, “महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांची प्रासंगिकता आजच्या काळात सर्वाधिक आहे. केवळ भाषणातून नव्हे, तर कृतीतून त्यांचे विचार आचरणात आणणे गरजेचे आहे. सत्य बोलणे, अहिंसेचे पालन करणे, परिसराची स्वच्छता राखणे, साधी राहणी ठेवणे आणि गरजेपुरतीच संसाधने वापरणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.” त्यांनी पुढे विद्यार्थ्यांना ‘जय जवान, जय किसान’ या शास्त्रीजींच्या घोषणेचे महत्त्व सांगत, देशभक्ती आणि स्वावलंबनाचा संदेश दिला. गांधीजींचे स्वच्छता अभियान आजच्या स्वच्छ भारत अभियानातून पुढे जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. गणेश रोडे यांनी गांधीजींच्या सत्याग्रह आणि शास्त्रीजींच्या प्रामाणिक नेतृत्वावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमास राज्यशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. गणेश रोडे, डॉ. सोनाली पाटील, प्रा. सुजित हांडोरे, प्रा. सुवर्णा धामणे यांच्यासह महाविद्यालयातील इतर विभागाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राज्यशास्त्र विभागाने मानले.





